पुणे-हुबळी वंदेभारत धावण्यापूर्वीच वादाच्या ट्रॅकवर; सांगलीचा थांबा रद्द केल्याची चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 05:51 PM2024-09-10T17:51:42+5:302024-09-10T17:52:03+5:30

नागरिक जागृती मंचकडून आंदोलनाचा इशारा

Controversy before the Pune-Hubli Vande Bharat run There is talk of canceling the stop at Sangli | पुणे-हुबळी वंदेभारत धावण्यापूर्वीच वादाच्या ट्रॅकवर; सांगलीचा थांबा रद्द केल्याची चर्चा 

पुणे-हुबळी वंदेभारत धावण्यापूर्वीच वादाच्या ट्रॅकवर; सांगलीचा थांबा रद्द केल्याची चर्चा 

सांगली : पुणे-हुबळी वंदेभारत एक्स्प्रेसला मंजुरी मिळाल्याची माहिती भाजप नेते तसेच प्रवासी संघटनांनी सोशल मीडियावरून जाहीर केली, मात्र दुसरीकडे मध्य रेल्वेने याबाबत कोणतीही अधिसूचना प्राप्त नसल्याचे सांगितल्याने प्रवाशांचा संभ्रम वाढला आहे. दुसरीकडे मंजूर वंदेभारतचा सांगलीतील थांबा रद्द केल्याचे वृत्त येताच नागरिक जागृती मंचने संताप व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा, माजी खासदार संजय पाटील यांनी या गाडीच्या मंजुरीची माहिती रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली. अनेक भाजप नेत्यांनी याबाबत केंद्र सरकारला सोशल मीडियावरून धन्यवादही दिले. सांगलीला थांबा मिळाल्याबद्दल स्थानिक आमदारांसह विविध पक्ष, संघटनांनी समाधान व्यक्त केले. मात्र सोमवारी दुपारनंतर सांगलीचा थांबा तांत्रिक कारणास्तव रद्द करण्याच्या हालचाली होत असल्याबाबतची चर्चा सोशल मीडियावर रंगली. त्यावरून पुन्हा रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात सूर उमटला.

मध्य रेल्वे म्हणते.. कोणतीही माहिती नाही

पुणे ते हुबळी किंवा हुबळी ते पुणे वंदेभारत एक्स्प्रेसच्या मंजुरीबाबत कोणतीही माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध नसून अधिसूचनाही प्राप्त नाही, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम वाढला आहे.


रेल्वेला मंजुरी मिळाली आहे. सांगलीचा थांबाही त्यात समाविष्ट आहे. तो रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही. दोन दिवसांत दिल्लीला जाऊन याबाबत माहिती घेऊन कोणत्याही परिस्थितीत सर्व थांबे कायम ठेवण्याचा आग्रह धरू. - संजय पाटील, माजी खासदार
 

केंद्रीयमंत्री, भाजपचे रेल्वे प्रकोष्ठचे अध्यक्ष व माजी खासदारांनी रेल्वेच्या मंजुरीबाबत दिलेली माहिती अधिकृतच आहे. याशिवाय सांगलीचा थांबा रद्द केल्याची चर्चाही होत आहे. हा थांबा कायम ठेवायला हवा. अन्यथा वंदेभारत एक्स्प्रेस मोठ्या उत्पन्नापासून वंचित राहील. - उमेश शहा, सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप

सांगलीचा थांबा रद्द करण्याचे कारस्थान नेहमीच केले जाते. मिरजेसह सांगलीला थांबे मिळावेत, अशी आमची मागणी असताना सांगलीबद्दल असुया बाळगली जाते. वंदेभारतचा थांबा रद्द झाल्यास भाजप नेत्यांना काळे झेंडे दाखविले जातील. - सतीश साखळकर, अध्यक्ष, नागरिक जागृती मंच

Web Title: Controversy before the Pune-Hubli Vande Bharat run There is talk of canceling the stop at Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.