खुर्च्यांवरुन वकिलांमध्ये वादावादी : पहिल्याच दिवशी प्रचंड गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:48 AM2018-03-13T00:48:19+5:302018-03-13T00:48:19+5:30
सांगली : येथील विजयनगरमधील नूतन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीत सोमवारपासून काम सुरु झाले. पण अनेक ज्येष्ठ वकिलांना खुर्ची न मिळाल्याने
सांगली : येथील विजयनगरमधील नूतन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीत सोमवारपासून काम सुरु झाले. पण अनेक ज्येष्ठ वकिलांना खुर्ची न मिळाल्याने वादावादीचे प्रकार घडले. मोक्याची जागा मिळविण्यावरुनही प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
अखेर दुपारी राजवाडा चौकातील जुन्या न्यायालयातील खुर्चा आणल्यानंतर हा गोंधळ कमी झाला. सांगली-मिरज रस्त्यावरील विजयनगर येथे चारमजली जिल्हा न्यायालयात इमारत बांधण्यात आली आहे. रविवारी या इमारतीचे उद्घाटन झाले आणि सोमवारपासून याठिकाणी कामही सुरु झाले. वकिलांच्या रुममध्ये खुर्चांची संख्या कमी तसेच नवीन ठिकाण असल्याने अनेक वकील सकाळी नऊ वाजताच जागा मिळविण्यासाठी आले होते.
काही खुर्चांना स्वत:च्या नावाचे लेबल चिकटविण्यात आले होते. उशिरा आलेल्या अनेक ज्येष्ठ वकिलांना जागा तसेच बसण्यासाठी खुर्चीही मिळाली नाही. एकमेकांची खुर्ची घेतल्याने तसेच त्यावरील नावाच्या लेबलवरुन काही वकिलांमध्ये वादावादी झाली. दुपारी तीन वाजता राजवाडा चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीतील खुर्चा व टेबले आणण्यात आली. वकिलांची गैरसोय होऊ नये, यासाठी संघटनेने दक्षता घेऊन त्यापद्धतीने बैठकीचे नियोजन केले.
सोमवारी तारीख असल्याने अनेक पक्षकार सकाळी नऊ वाजताच सुनावणी तसेच न्यायालय इमारत पाहण्यासाठी आले होते. वकिलांनी पक्षकारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी अॅड. शब्बीर पखाली, दीपक हजारे, आर. एम. क्षीरसागर, अॅड. एच. डी. जावीर, अॅड. वंदना चिवडे, आर. टी. कांबळे आदी उपस्थित होते. पक्षकारांनीही वकिलांना नवीन इमारतीतील पहिल्याच दिवशीच्या कामानिमित्त शुभेच्छा दिल्या. दिवसभर विविध खटल्यांचे कामकाज झाले.
राजवाडा चौकात शुकशुकाट
गेली अनेक वर्षे न्यायालयामुळे राजवाडा चौक ते गणेशदुर्ग परिसर गजबजलेला असायचा. वाहतुकीची कोंडी नेहमीच होत असे. पण न्यायालयाचे काम विजयनगरला सुरु झाल्याने सोमवारी राजवाडा चौकात शुकशुकाट होता. जुन्या न्यायालयातील साहित्य तसेच अनेक महत्त्वाच्या खटल्यांची कागदपत्रे नेण्याचे काम सुरु होते. मुद्रांक खरेदीसह अन्य कामांसाठी काही लोक न्यायालय आवारात आले होते.
वकील संघटनेचे नऊशेहून अधिक सदस्य आहेत. पण प्रत्यक्षात साडेपाचशे वकील न्यायालयात काम करतात. नवीन इमारत असल्याने जागा मिळविण्यासाठी सोमवारी मोठ्या प्रमाणात वकील आले होते. त्यामुळे गर्दी वाढल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. पण वादावादी झाली नाही. खुर्च्यांची व्यवस्था केली आहे.
- शैलेंद्र हिंगमिरे, अध्यक्ष, वकील संघटना सांगली.