आयुक्त-विरोधी पक्षनेत्यांत वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:55 AM2020-12-11T04:55:01+5:302020-12-11T04:55:01+5:30
सांगली : महापालिकेच्या मुख्यालयाऐवजी मंगलधाम येथे कुपवाड ड्रेनेज योजनेबाबत बैठक घेतल्याच्या कारणावरून आयुक्त नितीन कापडणीस व विरोधी पक्षनेते उत्तम ...
सांगली : महापालिकेच्या मुख्यालयाऐवजी मंगलधाम येथे कुपवाड ड्रेनेज योजनेबाबत बैठक घेतल्याच्या कारणावरून आयुक्त नितीन कापडणीस व विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्यात जोरदार वादावादी झाली. मंगलधाममध्ये बैठक घेण्यामागे काय गौडबंगाल आहे? असा सवाल करीत साखळकर यांनी जाब विचारला. यावेळी भाषेची मर्यादाही ओलांडली गेल्याचे समजते. अखेर साखळकर यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. वादावादीवेळी आयुक्तांची भाषा योग्य नव्हती. त्यांनी भाषा सुधारली नाही, तर त्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सध्या आयुक्त कापडणीस यांनी मंगलधाममधील महापालिका कार्यालयातून कारभार सुरू केला आहे. ते मुख्यालयातही येत नाहीत. त्यात मंगळवारी कुपवाड ड्रेनेज योजनेची बैठकही त्यांनी मंगलधाममध्ये बोलाविली होती. त्यासाठी पदाधिकारी, कुपवाडचे नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. या बैठकीबाबत विरोधी पक्षनेते साखळकर यांनी आयुक्तांना जाब विचारला. पालिकेचे मुख्यालय आहे, तिथे मोठे सभागृह आहे, मग बैठका मंगलधाममध्येच का? असा सवाल केला. त्यावरून दोघांत जोरदार खडाजंगी झाली. बैठकीला उपस्थित राहणार असाल तर राहा, अन्यथा जावा, असे वक्तव्यही आयुक्तांनी केले. दोघांतील वाद सुरू असताना, महापौरांसह इतर सदस्य मात्र मूग गिळून गप्प बसले होते.
याबाबत साखळकर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आयुक्तांनी महापौर तसेच पदाधिकाऱ्यांची परवानगी न घेता स्वतःच्या मर्जीने मंगलधाममध्ये बैठक घेण्याचे गौडबंगाल काय? ते मुख्यालय सोडून मंगलधाममध्ये का बसतात, हे समजत नाही. मुख्यालयात बैठक का घेतली नाही, असे विचारले असता, त्यांना उत्तर देता आले नाही. यावेळी त्यांनी न शोभणारी भाषा केली. ते मनपाचे मालक असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी भाषा सुधारली नाही, तर त्यांच्या भाषेत उत्तर देता येते, हे लक्षात घ्यावे, असा इशाराही साखळकर यांनी दिला.
चौकट
...तर आंदोलन करणार
आयुक्त मंगलधाममध्ये का जातात, मुख्यालयात का बसत नाहीत? हे त्यांनी स्पष्ट करावे. त्यांनी मुख्यालयात बसल्याचे मान्य न केल्यास, आंदोलन करून त्यांना मुख्यालयात बसण्यास भाग पाडू, असा इशाराही साखळकर यांनी दिला.