पहिल्या 'महिला महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा वाद पेटला, सांगलीचीच स्पर्धा अधिकृत - नामदेवराव मोहिते
By संतोष भिसे | Published: March 20, 2023 05:37 PM2023-03-20T17:37:53+5:302023-03-20T17:42:29+5:30
लोणीकंद किंवा कोल्हापुरातील स्पर्धा अधिकृत नसल्याचा दावा
सांगली : पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नियोजनाप्रमाणे सांगलीतच २३ व २४ मार्च रोजी होणार असल्याची माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी दिली. लोणीकंद किंवा कोल्हापुरातील स्पर्धा अधिकृत नसल्याचा दावा त्यांनी पत्रकार बैठकीत केला.
महिला केसरी कुस्तीसंदर्भात राज्यभरात वादंग माजले आहे. सांगलीत स्पर्धा होणार असल्याचे मोहिते यांनी जाहीर करताच, पुणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनीही लोणीकंद येथे स्पर्धेची घोषणा केली. `कुस्ती महासंघाने आम्हालाच मान्यता दिली असून अस्थायी समितीच्या माध्यमातून स्पर्धा घेणार आहोत. हीच महाराष्ट्रातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ठरेल` असा दावा त्यांनी केला आहे.
सांगली व पुण्याचा वाद मिटलेला नसतानाच, कोल्हापुरातही स्पर्धेची घोषणा झाली आहे. खासदार संजय मंडलिक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी सोमवारी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत स्पर्धा जाहीर केली. राज्य शासनाने मान्यता दिली असून, सर्व वादही मिटल्याचा दावा त्यांनी केला.
कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले, सांगलीतील मॅटवरील स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात होतील. २३ मार्चरोजी सकाळी महिला कुस्तीगीरांची वजने घेतली जातील. सायंकाळी व दुसऱ्या दिवशी स्पर्धा होतील. २४ मार्चरोजी सायंकाळी पारितोषिक वितरण होईल. स्पर्धेसाठी राज्यभरातून ४५ संघांतून सुमारे ४५० स्पर्धक येणार आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या संघांचाही सहभाग आहे. स्पर्धकांचा प्रवास, निवास व भोजनाचा खर्च परिषद करेल.
यावेळी परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास शिंदे, संपत जाधव, तसेच कृष्णा शेंडगे, प्रतापराव शिंदे, शिवाजी जाधव, हणमंतराव जाधव, सुनील मोहिते, रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रसिद्धीसाठी कोणीही, काहीही बोलत
सांगलीत परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले की, प्रसिद्धीसाठी कोणीही, काहीही बोलत आहे. कोठेही स्पर्धा घेत आहेत. पण सांगलीतील स्पर्धाच अधिकृत आहे. सर्वोच्च न्यायालयाने कुस्तीगीर परिषदेला मान्यता दिली आहे. त्यामुळे स्पर्धकांनी सांगलीतील स्पर्धेतच भाग घ्यावा. विजेत्यांना चांदीची गदा व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेतील प्रमाणपत्रच शासकीय सुविधा, नोकरी किंवा मानधनासाठी पात्र ठरणार आहे.
कोल्हापुरातीलच अधिकृत स्पर्धा - दीपाली सय्यद
राज्य शासनाच्या मान्यतेने, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व अस्थायी कुस्ती समितीच्या पुढाकाराने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापुरात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा होणार असल्याचे सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरात आज, सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तर, हीच अधिकृत स्पर्धा असेल, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे ही स्पर्धा आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.