VidhanSabha Election 2024: सांगली जिल्ह्यातील महाआघाडी, महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटणार कधी?
By अशोक डोंबाळे | Published: October 19, 2024 06:11 PM2024-10-19T18:11:39+5:302024-10-19T18:38:57+5:30
खानापूर, सांगली, तासगाव, जत मतदारसंघांवरून नेत्यांमध्ये मतभेद
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभांच्या मतदानासाठी केवळ ३३ दिवस शिल्लक राहिले असतानाही आठही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारी निश्चितीवरून महायुती, महाआघाडीच्या नेत्यांमधील मतभेदाचा तिढा सुटलेला नाही. सहा पक्षांमुळे जागा कुठली कुणाला सोडायची आणि उमेदवार कोणी द्यायचा, यावरूनच सध्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. प्रमुख नेत्यांची उमेदवारी निश्चित झाली असली, तरी प्रतिस्पर्धी उमेदवार कोण? हे निश्चित झालेले नाही.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. आजपासून बरोबर ३३ दिवस उमेदवारांना प्रचारासाठी शिल्लक राहिले आहेत. तरीही महायुती आणि महाविकास आघाडीमधील ५० ते ६० टक्के उमेदवार निश्चित झालेले नाहीत. मिरज मतदारसंघातून महायुतीकडून सुरेश खाडे तर महाआघाडीकडून मोहन वनखंडे अशी लढत होत आहे. वनखंडे हे एककेकाळचे खाडे यांचे स्वीय सहायक आहेत. पलूस-कडेगावमधून महाआघाडीकडून आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याविरोधात महायुतीकडून संग्रामसिंह देशमुख असा सामना रंगणार आहे. प्रथमच तुल्यबळ लढतीमुळे राज्याचे या मतदारसंघाकडे लक्ष असणार आहे.
शिराळा, इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, जत या चार विधानसभा मतदारसंघांतील महाआघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. पण, महायुतीमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक असल्यामुळे तेथील उमेदवार निश्चित होत नाहीत. जतमध्ये भाजपकडून प्रकाश जमदाडे, तमन्नगोडा रवी पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर तर शिराळ्यात भाजपचे सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक इच्छुक आहेत. खानापूरमध्ये सदाशिवराव पाटील की राजेंद्रअण्णा देशमुख याचा फैसला होत नाही. म्हणून येथील उमेदवार निश्चित झालेले नाहीत.
महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिंदेसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप असे प्रमुख तीन पक्ष आहेत. शिंदेसेनेने खानापूर, इस्लामपूर मतदारसंघांवर तर अजितदादा गटाने तासगाव-कवठेमहांकाळ, शिराळा विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. दावे-प्रतिदाव्यांच्या खिचडीमुळे उमेदवार निश्चित होत नाहीत. या गोंधळात उमेदवारांना प्रचाराचा कालावधी खूपच कमी मिळणार आहे. म्हणूनच उमेदवार निश्चित करून प्रचाराला सुरूवात करूया, अशी सर्वच पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे.
आठ विधानसभा मतदारसंघाचे चित्र
मतदारसंघ - महाआघाडी - महायुती
- इस्लामपूर - जयंत पाटील - उमेदवारी निश्चित नाही
- शिराळा - मानसिंगराव नाईक - उमेदवारी निश्चित नाही
- पलूस-कडेगाव - डॉ. विश्वजीत कदम - संग्रामसिंह देशमुख
- खानापूर - उमेदवार निश्चित नाही - सुहास बाबर
- तासगाव-क.महांकाळ - रोहित पाटील - प्रभाकर पाटील
- सांगली - उमेदवार निश्चित नाही - उमेदवार निश्चित नाही
- मिरज - मोहन वनखंडे - सुरेश खाडे
- जत - विक्रमसिंह सावंत - उमेदवार निश्चित नाही
दोन्ही गोटात अद्याप शांतता
सांगली विधानसभा मतदारसंघात प्रथमच महायुती आणि महाआघाडीचा उमेदवार निश्चित करण्यावरून कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुतीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी नकारा दिल्यामुळे उमेदवारी ठरत नाही. तसेच महाआघाडीत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात उमेदवारीवरून टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे. यामुळे सांगलीत महायुती आणि महाआघाडीचा उमेदवार निश्चित झाला नाही.