सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या लाचेवरून आटपाडीत उलट-सुलट चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:50+5:302021-04-07T04:28:50+5:30
आटपाडी : आटपाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी संशयिताला चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप ...
आटपाडी : आटपाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी संशयिताला चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप करून कारवाईसाठी सलग चार दिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आंदोलन करण्यात आले. पण आता पोलीस निरीक्षक पाटील यांनाच पंधरा हजार रुपये लाच देण्याचे आमिष दाखवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाच मागितली का लाच देण्याचे आमिष दाखविले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बोंबेवाडी (ता.आटपाडी) येथे दि. ७ मार्च रोजी सवर्ण आणि दलित अशी दोन गटात मारामारी झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली होती. या प्रकरणी दि. ९ मार्च रोजी काही संशयिताना अटक केली. दि. १४ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या कालावधीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी मारहाण केली. शिवाय चाळीस हजार रुपये मागणी केल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत पाटील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली १ एप्रिलपासून चार दिवस येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनाला यश येत नसल्याने दि. ५ एप्रिल रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. त्यानंतर पोलीस निरीक्षक बी.आर. निंभोरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.
दरम्यान, दि. ९ मार्च रोजी संशयिताना घरचे जेवण दिले नाही. राजेंद्र खरात यांना भेटू दिले नाही. याचा राग मनात धरून मारहाण केल्याचे खोटे सांगितले जात आहे तसेच संशयिताना गुन्ह्यातून वगळावे यासाठी मारुती विभुते (रा. बोंबेवाडी) यांच्या मार्फत पंधरा हजार रुपये देण्याचे आमिष दाखविले आहे तरी राजेंद्र खरात आणि मारुती विभुते हे आमच्या विरुद्ध मोर्चा काढण्याची, खोट्या तक्रारी करण्याची, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा खोटा सापळा करण्याची शक्यता आहे, अशी नोंद सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आता या आरोप-प्रत्यारोपामध्ये नेमकी खरी बाजू कोणाची, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चौकट
आंदोलनाआधी पोलीस डायरीत नोंद!
धरणे आंदोलन दि. १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. मात्र असे पोलिसांविरोधात आंदोलन होण्याची शक्यता दि.१२ मार्च रोजी पोलिसांच्या डायरीत नोंद करण्यात आली आहे. मी त्यांच्या आमिषाला बळी न पडता काम करीत आहे. पोलीस खात्याची बदनामी होणार नाही, असे कोणतेही कृत्य केलेले नाही, अशी पोलीस डायरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी आंदोलन करण्याआधी नोंद केली आहे.
तरीही पोलिसांना आंदोलकांना चार दिवस त्यांची समजूत काढण्यात किंवा त्यांना समजून सांगण्यात यश आले नाही हे विशेष.
कोट
आंदोलकांच्या मागणीबाबत सर्व माहिती पोलीस अधीक्षकांकडे पाठविली आहे. यावर योग्य ती कारवाई ते करतील.
- बी.आर. निंभोरे, पोलीस निरीक्षक, आटपाडी.
कोट
कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहे. आमच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी मारहाण करून पैशाची मागणी केली आहे.
- राजेंद्र खरात,
तालुकाध्यक्ष आरपीआय, आटपाडी