खानापूर तालुक्यात कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:19 AM2021-07-01T04:19:43+5:302021-07-01T04:19:43+5:30
विटा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विटा शहरासह खानापूर तालुक्यात ४५० रुग्णांचा मृत्यू झाला असून, आरोग्य विभागाने मात्र ११९ रुग्णांच्या ...
विटा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विटा शहरासह खानापूर तालुक्यात ४५० रुग्णांचा मृत्यू झाला असून, आरोग्य विभागाने मात्र ११९ रुग्णांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. मृत्यूच्या यादीत घोळ आहे. हा आकडा का लपविला, याचा खुलासा करावा; अन्यथा आंदोलन करून जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
मोहिते म्हणाले, हिंगणगादे गावात प्रत्यक्षात मी स्वतः १६ बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. मात्र शासनदरबारी केवळ चारजणांच्या मृत्यूची नोंद आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामाची शंका आल्याने खानापूर पंचायत समिती व नगरपरिषदेकडून कोरोना बाधित मृत्यूची माहिती घेतली. त्यावेळी प्रत्यक्षात ४५० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र आरोग्य विभागाने दुसऱ्याला लाटेतील मृत्यूची संख्या ११९ असल्याचे जाहीर केले आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला, तर त्या कुटुंबातील निराधार मुलांना शासनाने चार ते सहा लाख रुपयांपर्यंत मदत करण्याचे घोषित केले आहे; पण आरोग्य विभागाने कोरोना मृत्यू का लपवून ठेवले, याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
खानापूर तालुक्यात एवढे मृत्यू लपवून ठेवले असतील तर जिल्ह्यात आणि राज्यात आरोग्य विभागाचे काम कसे असेल, याच्या निषेधार्थ आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढली जाईल. असेल? किती मृत्यू दडविले याची माहिती घेऊन न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा मोहिते यांनी दिला. यावेळी नगरसेवक अमर शितोळे उपस्थित होते.