महांकालीदेवी मंदिराच्या बांधकामावरून वाद: कवठेमहांकाळ शहर बंद ठेवून ग्रामस्थांचा भव्य मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 06:53 PM2023-01-04T18:53:35+5:302023-01-04T18:54:17+5:30

जुन्याच मंदिरावर ट्रस्टी ठाम राहिल्याने आम्हाला जन आंदोलन उभे करावे लागले

Controversy over the construction of Mahakanalidevi temple: Grand march of villagers keeping Kavthemahankal town closed | महांकालीदेवी मंदिराच्या बांधकामावरून वाद: कवठेमहांकाळ शहर बंद ठेवून ग्रामस्थांचा भव्य मोर्चा

महांकालीदेवी मंदिराच्या बांधकामावरून वाद: कवठेमहांकाळ शहर बंद ठेवून ग्रामस्थांचा भव्य मोर्चा

googlenewsNext

महेश देसाई

शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्याचे आराध्य दैवत श्री महांकाली देवीच्या मंदिराच्या बांधकामावरून स्थानिक नागरिक व ट्रस्टमधील वाद विकोपाला गेला आहे. याविरोधात आज, बुधवारी (दि. ४) नागरिकांनी गाव बंद ठेवून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून ट्रस्टींचा निषेध व्यक्त केला. मोर्चाचे नंतर सभेत रूपांतर झाले. यावेळी आमदार सुमनताई पाटील आपण भाविकांच्या सोबत असल्याचे सांगत जोपर्यंत भाविकांच्या मनातील महांकालीचे मंदिर होत नाही तोपर्यंत या लढ्यात आपण मोठ्या ताकदीने सहभागी होऊ अशी ग्वाही दिली.

यावेळी सुमनताई पाटील म्हणाल्या, स्वर्गीय आर आर आबा पाटील यांनी कवठेमहांकाळ शहराचे आराध्य दैवत असलेले महांकाली मंदिर क वर्गात समाविष्ट केले व निधी प्राप्त करून दिला. आपणही शासन स्तरावर निधी मिळवून देऊ. त्याचबरोबर भक्तांच्या मनातील महांकाली मंदिर उभे करण्यासाठी कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांनी उभ्या केलेल्या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल जनतेच्या मनातील हे मंदिर उभे करण्यासाठी मी तुमच्या बरोबर असेन अशी ग्वाही दिली. 

महांकाली देव व मारुती देव ट्रस्टने श्री महांकाली मंदिराच्या सुशोभिकरणाचा आराखडा असलेला फलक मंदिर परिसरात लावला. शहरातील नागरिकांनी तो आराखडा योग्य वाटला नाही. त्यात गाळ्यांचा समावेश असून, त्याला नागरिकांचा विरोध आहे. त्याऐवजी गाळे नसल्याचा आराखडा मंजूर करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

सर्वपक्षीय आणि सर्व धर्मीय भाविकांनी काढलेल्या मोर्चाची सुरुवात मल्लिकार्जुन देवालयापासून होऊन हा मोर्चा युवाहानी चौकातून शिवाजी चौकात आला. त्यानंतर स्टेट बँकेपासून पुढे महांकाली मंदिरापर्यंत मोर्चा सरकला तिथे आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत हजारो भाविकांनी देवीची आरती केली. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर जुन्या तहसील कार्यासमोर मोठ्या सभेत झाले. 

महाकाली मंदिराच्या ट्रस्टी बरोबर अनेक वेळा बैठका झाल्या. मात्र ट्रस्टीनी वेळ काढूपणा धोरण अवलंबून जुन्याच मंदिरावर ट्रस्टी ठाम राहिल्याने आम्हाला जन आंदोलन उभे करावे लागले आता या आंदोलनातून मागे हटणार नाही अशी स्पष्ट भूमिका या आंदोलनाचे प्रमुख दिलीप पाटील यांनी मांडली. मोर्चा दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

Web Title: Controversy over the construction of Mahakanalidevi temple: Grand march of villagers keeping Kavthemahankal town closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली