सहकार आयुक्तांकडून सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश, राजू शेट्टी यांनी दिली माहिती
By अशोक डोंबाळे | Published: June 1, 2024 04:54 PM2024-06-01T16:54:08+5:302024-06-01T16:54:27+5:30
कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधकांना सूचना
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरव्यवहाराची आणि बँकेत झालेल्या आर्थिक अनियमिततेबाबत तातडीने चौकशी करण्याचे आदेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांना दिले आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. बँकेतील घोटाळ्याशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणीही शेट्टी यांनी सहकार आयुक्तांकडे केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले, जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी आहे. या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँकेच्या कामकाजात अनियमितता असून, अनेक घोटाळे झालेले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने व अधिकाऱ्यांनी केलेल्या कारनाम्यावर पांघरून घालण्याचा प्रकार सुरू आहे. सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसाने झालेले नुकसान भरपाईचे पैसे राज्य शासनाकडून जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांकडे वर्ग झाले नाहीत. कर्मचाऱ्यांनी बोगस खाती काढून ते पैसे परस्पर काढले आहेत. ताळेबंद पत्रकात बोगसगिरी करून फेररफार केल्याचे दिसते.
बँकेमध्ये राजकारण्यांनी दंडेलशाही चालू केल्याने गैरप्रकार वाढले आहेत. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. मनमानी कारभारामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या कारभाराविरोधात वेळोवेळी तक्रार केली आहे, मात्र शासनाने कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे दुष्काळग्रस्तांच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला आहे. याबाबत सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन दीपक तावरे यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर यांना बँकेच्या गैरव्यवहाराची अधिनिस्त फिरत्या पथकामार्फत चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
जिल्हा बँक ही शेतकरी व कष्टकऱ्यांची बँक आहे. बँकेच्या गैरकारभारात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, तसेच या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.