घरकुल सुविधांचा फ्लॉप शो
By Admin | Published: March 27, 2016 11:34 PM2016-03-27T23:34:24+5:302016-03-28T00:19:50+5:30
इस्लामपुरातील योजना : ५० टक्क्यांहून अधिक घरे वापराविना
अशोक पाटील -- इस्लामपूर इस्लामपूर शहरातील बेघरांना घरे मिळावीत यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुन अद्ययावत घरकुल योजना अंमलात आणली. बांधलेल्या घरकुलांच्या इमारती बाहेरील बाजूने पाहिले असता मुंबई शहराची आठवण होते. परंतु येथे राहणाऱ्यांना पालिकेने मूलभूत सुविधा पुरविलेल्या नाहीत. त्यामुळे येथील ५० टक्क्याहून अधिक घरे वापराविना पडून आहेत. तर महादेवनगर परिसरातील घरकुलांची अवस्था दयनीय झाली आहे. एकूणच घरकुलांच्या सुविधांचा फ्लॉप शो ठरत आहे.
प्रारंभीच्या टप्प्यात पालिकेने महादेवनगर परिसरात दारिद्र्य रेषेखालील लोकांना घरे देण्यासाठी घरकुल योजना राबवली. या योजनेतील सर्व घरांचे वाटप झाले आहे. परंतु यातील बहुतांशी कुटुंबे राहण्यासच आलेली नाहीत. तर काहींनी आपली घरकुले अवैधरित्या भाड्याने दिली आहेत. याच ठिकाणी बांधलेल्या भाजी मार्केटची अवस्था दयनीय असून, ते वापराविना पडून आहे. काही घरामध्ये जुगाराचा व्यवसाय सुरु असल्याचे समजते.
दुसऱ्या टप्प्यात अद्ययावत अशा १६ इमारती उभ्या करण्यात आल्या. एका इमारतीमध्ये २६९ स्क्वेअर फुटाचे २४ घरकुल आहेत. अशी एकूण ३८४ घरकुले बांधून तयार आहेत. त्यापैकी २४0 घरांचे वाटप झाले आहे. या कुटुंबाने प्रारंभीच्या टप्प्यात १५ हजार रुपये भरले आहेत. तर लाईट व पाण्यासाठी ११ हजार रुपये भरण्यात आले आहेत. पाण्याची सुविधा झाली असली तरी अद्याप लाईट व्यवस्था नसल्याने येथील अनेक घरकुले वापराविना पडून आहेत. तर काहींनी घरकुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अवैधरित्या लाईट घेतली आहे.
शहरातील दारिद्र्यरेषेखालील लोकांचा फेरसर्व्हे करणे गरजेचे आहे. ज्यांना या घरकुलामध्ये घरे मिळाली आहेत, ते दारिद्र्यरेषेखालीच नाहीत. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असणाऱ्यांनाही या घरकुलात घरे देण्यात आली आहेत. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे. जेणेकरुन खरोखरच जे बेघर आहेत अशांना घरे मिळतील.