सोहोलीत नववधूचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 06:54 PM2020-07-19T18:54:28+5:302020-07-19T18:56:33+5:30
सोहोली (ता. कडेगाव) येथील नववधूचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वºहाडी मंडळीसह हळदी, कुंकू कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना क्वारंटाईन करावे लागले.
कडेगाव : सोहोली (ता. कडेगाव) येथील नववधूचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वºहाडी मंडळीसह हळदी, कुंकू कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना क्वारंटाईन करावे लागले.
भिकवडी (खुर्द) येथे झालेल्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या, तसेच लग्नानंतर या नववधुच्या संपर्कात आलेल्या सोहोली येथील ३२ व भिकवडी येथील ५४ अशा एकूण ८६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
२८ जून रोजी भिकवडी खुर्द येथील मुलीचा सोहोली येथील मुलाबरोबर भिकवडी खुर्द येथे विवाह झाला. संचारबंदीमुळे ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. विवाहानंतर ११ जुलै रोजी नवरी मुलीच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
यामुळे प्रशासनाने लग्नाला उपस्थित असलेल्या सोहोली येथील वºहाडी मंडळींना व भिकवडी येथील उपस्थिताना होम क्वारंटाईन केले होते. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील भिकवडी येथील १० जणांना कडेगाव येथे संस्थात्मक क्वारंटाईन केले.
दरम्यान, मृत व्यक्तीच्या सदाशिवगड (ता. कºहाड, जि. सातारा) येथील जावयाचा कोरोना चाचणी अहवाल ९ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला. जावई भिकवडी येथे मेव्हणीच्या लग्नाला आले होते, तसेच ७ जुलै रोजीही सासूरवाडीला येऊन गेले होते.
दरम्यान, लग्नानंतर सोहोली येथे सासरी गेलेली नवरी मुलगी २ जुलै रोजी माहेरी भिकवडी येथे आली होती. यानंतर ५ जुलै रोजी पुन्हा सोहोली येथे सासरी गेली. ११ जुलै रोजी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भिकवडी येथील कुटुंबियांसह नवरी मुलीलाही संस्था क्वारंटाईन केले होते.
१४ जुलै रोजी मृत व्यक्तीचे आई, वडील, पत्नी, दोन वर्षांचा नातू, भाऊ व भावजय अशा सहा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यानंतर शनिवार, दि. १८ जुलै भिकवडी येथील मृत व्यक्तीची मुलगी, तसेच सोहोली येथे सासरी गेलेली नववधू व सदाशिवगड येथील मुलगी तसेच पुतणी, अशा चौघींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नववधूच्या पतीचा कोरोना चाचणी अहवाल काही दिवसांपूर्वी निगेटिव्ह आला आहे.