corona in sangli : वैद्यकीय साधन सामुग्रीसाठी 77 लाख 71 हजार रूपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 04:50 PM2020-04-09T16:50:53+5:302020-04-09T17:17:56+5:30
कोवीड-19 करीता प्रस्तावीत केलेल्या वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी जिल्हा प्रशासनाने 77 लाख 71 हजार 860 रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे कोवीड-19 रूग्णालय म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या साधन सामुग्रीसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2019-20 अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी महाराष्ट्र कोवीड-19 करीता प्रस्तावीत केलेल्या वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी जिल्हा प्रशासनाने 77 लाख 71 हजार 860 रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याला आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल असा दिलासा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला होता. जिल्ह्यात ज्या वैद्यकीय साधन सामुग्रीची आवश्यकता आहे, अशांचा आढावा घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासनाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना 77 लाख 71 हजार 860 रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या निधीतून व्हेंटीलेटर, मल्टी पॅरा मॉनिटर, ईसीजी मशिन, सक्शन मशिन, ॲटोक्लेव्ह मशिन, आरओ प्लँट, स्टीम स्क्रबर मशिन, बॅटरी स्प्रेअर वुईथ फ्रॉगर मशिन , एन-95 मास्क, लॅटेक्स हॅण्डग्लोज, गॉगल्स, पीपीई किट आदि अद्ययावत साधन सामुग्री खरेदी करण्यात येणार आहे. तसेच ॲटोमेटेड न्युक्लिक ॲसीड एक्सट्रॅक्शन सिस्टीमसाठी 14 लाख 87 हजार रूपयांची मागणी प्रस्तावीत आहे.
सदर वैद्यकीय साधन सामुग्रीमुळे कोरोना बाधीत रूग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार असून यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केले. जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई च्या अधिष्ठाता व कोवीड-19 समिती अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांनी पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आभार मानले आहेत.