जिल्ह्यात ५६ जणांना कोरोना; ७४ जण झाले कोराेनामुक्त;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:04 AM2020-12-05T05:04:36+5:302020-12-05T05:04:36+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ बुधवारीही कायम होती. दिवसभरात ५६ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर ७४ जणांनी कोरोनावर ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ बुधवारीही कायम होती. दिवसभरात ५६ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर ७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. सलग तिसऱ्यादिवशी बाधितांची संख्या वाढली आहे.
सोमवारपासून सरासरी ५० च्या दरम्यान बाधितांच्या संख्येची नोंद होत आहे. बाधितांची संख्या वाढत असली तरी, कोरोनातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे. मृत्यूच्या प्रमाणातील घट मात्र कायम असल्याने दिलासा मिळाला आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने बुधवारी आरटीपीसीआरअंतर्गत ३०० जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच रॅपिड ॲन्टिजेनच्या १३४६ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यात ३३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तासगाव व वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात मात्र एकही मृत्यू झालेला नाही.
उपचार घेत असलेल्या ४२० रुग्णांपैकी ८५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ७० जण ऑक्सिजनवर, तर १५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्यात उपचारासाठी आलेल्या कोल्हापूरच्या एकाला, तर सातारा जिल्ह्यातील दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
कोरोना बळी १७०० वर
बुधवारी जिल्ह्यातील कोरोना बळींच्या संख्येने १७०० चा टप्पा गाठला. जिल्ह्यात कोरोना आल्यानंतर तीन महिन्यांनी पहिला बळी गेला होता. गेल्या महिन्याभरापासून मृत्यूचे प्रमाण घटले असले तरी, बुधवारी १७०० बळींची संख्या पूर्ण झाली.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४६८७८
उपचार घेत असलेले ४२०
कोरोनामुक्त झालेले ४४७५८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७००
बुधवारी दिवसभरात...
सांगली ९
मिरज ६
खानापूर ८
कडेगाव, वाळवा प्रत्येकी ५
तासगाव, मिरज तालुका ४
जत ३
कवठेमहांकाळ, शिराळा १