कोरोनामुळे नगरसेवक आले आॅनलाईन पहिल्याच प्रयोग यशस्वी : दंगा, गोंधळाला फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 04:45 PM2020-05-05T16:45:45+5:302020-05-05T16:47:19+5:30
पण आॅनलाईन सभेत मात्र मौनी सदस्यांनीही मौन सोडले होते. संचारबंदीमुळे अनेक नगरसेवकांची दाढी वाढलेली होती. त्यांचा लुक बदललेला होता. त्यावर दाढीतील लुक चांगला दिसतो, अशी कमेंट खुद्द आयुक्तांसह सदस्यांनीही केली.
शितल पाटील
सांगली : महापालिकेची सभा म्हटले की गोंधळ, दंगा, आरोप-प्रत्यारोप. पण कोरोनामुळे या गोंधळाला सोमवारी फाटा मिळाला. पहिल्यांदाच महापालिकेने झुम अॅपद्वारे आॅनलाईन सभा घेतली. सभेत ८० हून अधिक नगरसेवक, अधिकारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मौनी असलेल्या सदस्यांनीही आपले मौन सोडत प्रश्न उपस्थित केले. महापालिकेच्या प्रत्येक सभेत कोणत्या ना कोणत्या विषयावरून गोंधळ ठरलेला असतो. कधी एकमेकांच्या अंडरस्टँडिंगने तर कधी अधिकारी, प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी सभेत वादळी चर्चा होत असते. त्यातून सभेचे कामकाज अवघ्या काही मिनिटांतही आटोपल्याचे प्रकार घडले आहेत.
पण सोमवारी महापालिकेच्या सभेचे चित्र काही वेगळेच होते. कोरोनामुळे सर्वच नगरसेवक सध्या घरीच लॉकडाऊन झाले आहेत. या सर्व नगरसेवकांना झुम अॅपद्वारे एकत्र करून सभेचे कामकाज पार पडले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली सभा दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत चालली. प्रत्येक सदस्यांला बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांचे प्रश्न ऐकून त्यावर आयुक्तांनी खुलासाही केला. जवळपास ८० नगरसेवक व अधिकाऱ्यांनी यात भाग घेतला. त्यासाठी सिस्टिम मॅनेजर नकुल जकाते यांनी मोठे योगदान दिले.
मुख्यालयातील वसंतदादा सभागृहात महापौर, आयुक्त व नगरसचिव हे तिघेच उपस्थित होते. समोर स्क्रिनवर सर्व सदस्यांना एकत्र करण्यात आले होते. उपायुक्तापासून इतर अधिकारी त्यांच्या कार्यालयातून आॅनलाईन आले होते. यापूर्वीच्या महासभेत कधी बोलण्याची संधी न मिळालेल्या नगरसेवक, नगरसेविकांनीही प्रश्न उपस्थित केले. महासभेत केवळ निम्म्याहून अधिक सदस्य केवळ हजेरीपुरतेच आलेले असतात. पण आॅनलाईन सभेत मात्र मौनी सदस्यांनीही मौन सोडले होते. संचारबंदीमुळे अनेक नगरसेवकांची दाढी वाढलेली होती. त्यांचा लुक बदललेला होता. त्यावर दाढीतील लुक चांगला दिसतो, अशी कमेंट खुद्द आयुक्तांसह सदस्यांनीही केली.
सोशल मिडीयावर लाईव्ह या सभेचे कामकाज महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवरही लाईव्ह दाखविण्यात आले. त्यावर चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या. नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांच्यासह अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करीत यापुढे सर्वच सभा लाईव्ह प्रसारित करण्याची मागणी केली.