corona cases in Sangli : जन्मापूर्वीपासूनच ३७५ बालकांचा कोरोनाविरुद्ध लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:24 PM2021-06-13T12:24:15+5:302021-06-13T12:26:18+5:30
corona cases in Sangli : अवघे जग कोरोनाविरोधात लढत असल्याच्या युद्धजन्य काळातच ३७५ बालकांनी या जगात प्रवेश केला. विशेष म्हणजे यातील बहुतांश अर्भके जन्मत:च कोरोनाबाधित होती, पण योग्य वैद्यकीय उपचार आणि जन्मजात प्रतिकारशक्तीच्या जोरावर ती कोरोनामुक्त झाली आहेत.
संतोष भिसे
सांगली : अवघे जग कोरोनाविरोधात लढत असल्याच्या युद्धजन्य काळातच ३७५ बालकांनी या जगात प्रवेश केला. विशेष म्हणजे यातील बहुतांश अर्भके जन्मत:च कोरोनाबाधित होती, पण योग्य वैद्यकीय उपचार आणि जन्मजात प्रतिकारशक्तीच्या जोरावर ती कोरोनामुक्त झाली आहेत.
शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकांनी हे यश मिळवले. कोरोना व लॉकडाऊन काळात अनेक महिलांचा कल गर्भधारणा टाळण्याकडे होता. त्यातूनही गर्भवती राहिलेल्या महिलांची खासगी रुग्णालयांत सोय झाली. कोरोनाबाधित गर्भवतींसाठी मात्र फक्त मिरज कोविड रुग्णालयांतच सोय होती. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:ला सुरक्षित ठेवत डॉक्टरांनी प्रसुती यशस्वी केल्या.
एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या पहिल्या लाटेच्या कालावधीत २४९ महिलांची प्रसुती झाली, तर गेल्या मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत १२६ प्रसुती झाल्या. या महिलांवर कोरोनाचे उपचारही सुरु होते, त्यामुळे प्रसुती अधिक आव्हानात्मक होती. प्रसुतीकाळात रक्तदाब, मधुमेह, काविळ आदी विकार ऐनवेळी उदभवत असल्याने कोरोनाच्यादृष्टीने धोक्याची स्थिती होती.
नवजात अपत्यांना जन्मत:च कोरोना संसर्ग होत असल्यानेही डॉक्टरांच्या चिंतेत भर पडली होती. ३७५ पैकी किमान २२५ अर्भकांमध्ये कोरोनाची अतिसौम्य लक्षणे दिसत होती, पण मातेसोबतच त्यांच्या शरिरातही कोरोनाची प्रतिजैवके तयार राहिली, त्यामुळे ही अर्भके कोरोनातून सहिसलामत बाहेर पडली. जन्मल्यावर पहिल्या काही दिवसांतच कोरोनाची लक्षणे नाहीशी झाली, अर्भके ठणठणीत झाली. त्यांच्यावर कोरोनाचे विशेष उपचार करावे लागले नाहीत.
सहा अर्भकांचा गर्भातच मृत्यू
कोरोनाबाधित सहा गर्भवतींच्या अर्भकांचा गर्भातच मृत्यू झाला, पण तो कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले. महिलांमध्ये अन्य गुंतागुंत निर्माण झाल्याने ही अर्भके जगात प्रवेश करु शकली नाहीत.
नवजात अर्भकांमध्ये कोरोनाविरोधातील प्रतिजैविके निसर्गत:च तयार झाली होती, त्यामुळे त्यांनी कोरोनावर सहज मात केली. बालकांना कोरोनाचे वेगळे उपचार द्यावे लागले नाहीत. कोरोनामुळे त्यांच्या जीवाला धोकाही नव्हता.
- डॉ. नंदकिशोर गायकवाड,
प्रसुती विशेषज्ञ, शासकीय रुग्णालय.