कोरोनाच्या मगरमिठीत ऑक्सिजन, बेड आणि रेमडेसिविरचीही टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:26 AM2021-04-17T04:26:08+5:302021-04-17T04:26:08+5:30
सांगलीला कोरोनाची लस पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने टंचाईस्थिती आहे. अनेक ठिकाणी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे, तर ठिकठिकाणी रांगा ...
सांगलीला कोरोनाची लस पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने टंचाईस्थिती आहे. अनेक ठिकाणी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे, तर ठिकठिकाणी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सांगलीत महापालिकेच्या अभयनगर आरोग्यवर्धिनी केंद्रात शुक्रवारी सकाळी लस घेण्यासाठी रांग लांगली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू होताच व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. यात भरीस भर म्हणून कोरोना लसीचा पुरवठादेखील विस्कळीत झाला आहे. या गंभीर स्थितीत रुग्णांवर उपचार करण्यात अडथळे येत आहेत.
गेल्या आठवडाभरापासून दररोज ५०० ते १००० नवे कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यांच्यासाठी बेड, ऑक्सिजनची व्यवस्था करताना आरोग्य यंत्रणेबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांचीही तारांबळ उडू लागली आहे. जिल्ह्यात सध्या रेमडेसिविरचा साठा जेमतेम आहे. त्याचा सरसकट व अनावश्यक वापर करु नये, अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत, त्यामुळे इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांवर पळापळ करण्याची वेळ अद्याप आलेली नाही.
ऑक्सिजनबाबतही आणीबाणीची परिस्थिती अद्याप नाही. जिल्ह्याला दररोज २१ टन ऑक्सिजन लागतो. तो दोन एजन्सी पुरवतात. सर्व ऑक्सिजन फक्त वैद्यकीय कारणासाठी वापरण्यात येत आहे. उद्योगांचा पुरवठा पूर्णत: बंद केला आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी मात्र रुग्णांच्या नातेवाईकांची रात्रं-दिवस पळापळ सुरु आहे. जिल्ह्यात ३२२ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. एकूण बेडची संख्या २,२८५ आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचा व्हेंटिलेटर बेडसाठी आग्रह दिसत आहे, त्यामुळे सद्यस्थितीत बहुतांश व्हेंटिलेटर बेड फुल्ल झाल्याचे चित्र आहे.
चौकट
दररोज २१ टन ऑक्सिजनचा वापर
सध्या जिल्ह्यात दिवसाला सुमारे २१ टन ऑक्सिजन पुरवठा गरजेचा आहे. सांगली व इस्लामपूर येथील दोन एजन्सींमार्फत तो पुरवला जातो. शिवाय मिरज कोविड रुग्णालयात सहा हजार किलोलीटर क्षमतेची नवी टाकीदेखील उभारण्यात आली आहे, त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा तूर्त नाही. उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा पूर्णत: बंद केला आहे. रायगड, पुण्याहून सांगलीला ऑक्सिजन मिळतो, पण सध्या कर्नाटकातूनही धारवाडमधूनही आणला जात आहे. खासगी रुग्णालयांत त्याचा अनाठायी वापर होऊ नये, यावर प्रशासनाचे लक्ष आहे.
पुढे काय? : ऑक्सिजनचा अवाजवी वापर रोखण्यासाठी खासगी रुग्णालयांतील वापराचे ऑडिट केले जाणार आहे. तशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिल्या आहेत.
चौकट
रेमडेसिविरबाबत जिल्हा टंचाईच्या काठावर
रेमडेसिविर इंजेक्शनची जिल्ह्याची दररोजची गरज सरासरी ७५० इतकी आहे. याचा पुरवठादेखील जेमतेम असला तरी टंचाईस्थिती नाही. बुधवारअखेर १,४०० इंजेक्शन्स उपलब्ध होती. पुणे विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार सुमारे दीड हजार इंजेक्शन्स पुण्याला पाठविण्यात आली, पण ती ऊसनवार स्वरुपात दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रेमडेसिविरच्या उपलब्धतेवर पालकमंत्री जयंत पाटील स्वत: लक्ष ठेवून आहेत. या इंजेक्शनचा वापरही गरजेनुसार व आरोग्य विभागच्या नियमांना अनुसरुन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
पुढे काय ? : रेमडेसिविर इंजेक्शनसाठी सांगली जिल्ह्याचा वाटा फक्त एक टक्का असल्याचा दावा केमिस्ट असोसिएशनने केला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा वाटा वाढविण्याची गरज आहे.
चौकट
लसीअभावी लसीकरणाला ‘ब्रेक’
कोरोना लसीकरणाने वेग घेतला असला, तरी मागणीनुसार पुरवठा होत नसल्याचे दिसत आहे. २५१ केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. दररोजचे सरासरी लसीकरण १८ ते २० हजार होते. त्या प्रमाणात लस मिळत नाही. लसीअभावी मोहीम ठप्प होण्याचे प्रकार आठवड्यातून दोन-तीनदा घडतात. सध्या दुसरा डोस सुरु झाल्याने मागणी आणखी वाढली आहे. गुरुवारअखेर ३ लाख ६९ हजार १५५ जणांचे लसीकरण पूर्ण झाले होते.
पुढे काय ? : आरोग्य विभागाने दोन लाख लसींची मागणी नोंदवली आहे, पण आतापर्यंत १ लाख ३ हजार डोस मिळाले आहेत. लस येईल त्यानुसार लसीकरण सुुरु आहे.
कोट
कोरोना उपचारासाठी आरक्षित खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजनचा अपव्यय टाळण्यासाठी ॲक्सिजन ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. आजमितीस जिल्ह्यात रेमडेसिविरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याचा तुटवडा टाळण्यासाठी गरज भासली तरच रुग्णासाठी वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णाला रेमडेसिविरच्या मात्रा अनावश्यकरित्या देण्यात येऊ नयेत, असेही सांगितले आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड गतीने वाढत असून, ही चिंतेची बाब आहे. बेड, ऑक्सिजन व अन्य अनुषंगिक वैद्यकीय सुविधा आजमितीस पुरेशा असल्या, तरी या यंत्रणांना मर्यादा आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी