CoronaVirus Lockdown : घरपोच सेवा : कोरोनाप्रश्नी उपाय नवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:21 PM2020-03-30T17:21:48+5:302020-03-30T17:22:58+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने किराणा माल, भाजीपाला व दूध घरपोच करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेले दोन दिवस रस्त्यावर झालेली गर्दी पाहायला मिळाली नाही. नगरसेवकांनी प्रशासनाच्या या कामात स्वत: सहभाग घेतला आहे. काही जणांनी वस्तू पोहोच करण्यासाठी तरुणांची पथके तयार केली, तर काहींनी दुकानात बाहेर सर्कल काढून सुरक्षित अंतराची मर्यादा पाळण्यास भाग पाडले.
सांगली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने किराणा माल, भाजीपाला व दूध घरपोच करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेले दोन दिवस रस्त्यावर झालेली गर्दी पाहायला मिळाली नाही. नगरसेवकांनी प्रशासनाच्या या कामात स्वत: सहभाग घेतला आहे. काही जणांनी वस्तू पोहोच करण्यासाठी तरुणांची पथके तयार केली, तर काहींनी दुकानात बाहेर सर्कल काढून सुरक्षित अंतराची मर्यादा पाळण्यास भाग पाडले.
बुधवारी १९ ठिकाणी भाजीपाला केंद्रेही सुरू केली. पण या भाजीपाला केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे महापालिकेने भाजीपाला केंद्रे बंद केली. तीच अवस्था किराणा माल दुकानांसमोरही होऊ लागली. अखेर आयुक्त नितीन कापडणीस यांनी किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, दूध विक्रेते यांची बैठक घेऊन, घरपोच सुविधा देण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेने १९६ किराणा दुकानदारांची यादी त्यांच्या मोबाईल नंबरसह प्रसिद्ध केली आहेत. प्रत्येक वॉर्डनिहाय किराणा माल पोहोच केला जाणार आहे. तसेच जवळपास २४ दूध विक्री केंद्रांची यादी जाहीर केली आहे, तर प्रत्येक वॉर्डात ५ भाजी विक्रेते, याप्रमाणे सुमारे शंभर भाजी विक्रेत्यांचे मोबाईल नंबर व नाव जाहीर केली आहेत.
परिणामी गुरुवारी सकाळी शहरातील भाजी मंडईत व किराणा दुकानांसमोर होणारी गर्दी कमी होती. दुपारनंतर तर पूर्ण शहरातच घरपोच सेवेमुळे चित्र बदलून गेले. फारसे नागरिक रस्त्यावर उतरले नाहीत.