शहरात कोरोना वाढतोय चोरपावलांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:29 AM2021-03-09T04:29:24+5:302021-03-09T04:29:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती पाहता सांगली शहर पुन्हा धोकादायक वळणावर आहे. त्यात नागरिकांनी नियमांना हरताळ फासला असून गर्दीच्या ठिकाणी कुठलेही नियम पाळले जात नसल्याचे दिसून येते. नागरिकांची हीच बेफिकिरी अनेकांच्या जीवावर उठण्याची भीती आहे.
महापालिका क्षेत्रात गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातही मिरजेपेक्षा सांगली शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. चाचणी करून घेणाऱ्यांची संख्याही मर्यादित आहे. अनेकांनी खासगी लॅबमध्ये चाचण्या केल्या आहेत. त्याचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर खासगी डाॅक्टरांकडून उपचार घेत आहेत. त्यामुळे सध्या कागदावर कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात सांगली शहरात धोका वाढल्याचे चित्र आहे. यातच काही उत्साही महाभाग मात्र हा धोका ओळखायला तयार नाहीत. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला होता. रुग्णांना बेडही मिळत नव्हते. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास हीच स्थिती पुन्हा येण्याची भीतीही वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
सध्या शहरातील आठवडे बाजार हाउसफुल्ल आहेत. अनेक विक्रेते विनामास्कच व्यवसाय करतात. ग्राहक म्हणून बाजारात आलेला नागरिकही योग्य ती खबरदारी घेताना दिसत नाही. रस्त्यावर दुचाकीस्वार विनामास्क फिरत आहेत. गतवर्षी नागरिकांनी कोरोनाशी मुकाबला करताना खबरदारी घेतली होती. पण आता कुणीच फारसे गंभीर दिसत नाही. मुख्य बाजारपेठा, हाॅटेल्स, क्रीडांगणे अशा विविध ठिकाणी कुठल्याच नियमांचे पालन होत नाही. नागरिकांच्या या बेफिकीर वृत्तीमुळे गेल्या काही दिवसांत महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची ही वृत्ती कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
चौकट
नियमांना हरताळ
हाॅटेल, दुकाने, बसस्थानक, भाजीपाला व फळ बाजारासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली निश्चित केली आहे. पण आता या घटकांनी नियमांना तिलांजली दिली आहे. या सर्वच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. अनेक जण तोंडाला मास्कही वापरत नाहीत. सॅनिटायझरची सोयही अनेक ठिकाणी नाही. प्रशासनाने नियम न पाळणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातूनही अनेक जण अद्याप शहाणे झालेले नाहीत.