टाकळीत एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:28 AM2021-05-21T04:28:04+5:302021-05-21T04:28:04+5:30

टाकळी : कोरोनाचा संसर्ग लपवणाऱ्यामुळे अन्य नातलग बाधित झाले. परिणामी एकाच कुटुंबातील तिघांना हकनाक प्राण गमवावे लागले. टाकळी (ता. ...

Corona kills three members of same family | टाकळीत एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू्

टाकळीत एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू्

Next

टाकळी : कोरोनाचा संसर्ग लपवणाऱ्यामुळे अन्य नातलग बाधित झाले. परिणामी एकाच कुटुंबातील तिघांना हकनाक प्राण गमवावे लागले. टाकळी (ता. मिरज) येथील घटनेने गावकरी हादरले असून कुटुंबाप्रती हळहळ व्यक्त होत आहे.

मिरजेपासून जवळ असल्याने टाकळीमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. अनेकजण बाधित असतानाही माहिती लपवताहेत. गावात बिनधास्त फिरून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत. अशाच एका बेजबाबदार व्यक्तीमुळे बाहुबली पाटील, त्याची आई व चुलत्याचा बळी गेला. या व्यक्तीने संसर्गाची माहिती शासकीय यंत्रणेला दिली नाही. खासगी डॉक्टरकडून उपचार सुरू ठेवले. तो आजारी असल्याने विचारपूस करण्यासाठी बाहुबली यांची आई गेली, त्यावेळीही त्याने कोरोनाबाधित झाल्याचे लपवून ठेवले. काही दिवसांतच बाहुबली यांच्या आई कोरोनाग्रस्त झाल्या. पाठोपाठ बाहुबली, त्यांची पत्नी व अन्य कुटुंबीय असे सहाजण बाधित झाले. सौम्य लक्षणांमुळे काही दिवस घरातच उपचार घेतले. मात्र, नंतर त्रास वाढल्याने रुग्णालयात दाखल झाले.

बाहुबली, त्यांची आई, दोघे चुलते व एका चुलतभावाला कोल्हापुरात खासगी रुग्णालयात दाखल केले. सौम्य लक्षणांमुळे पत्नी घरीच उपचार घेत होती. रुग्णालयातील उपचारांचा उपयोग न होता बाहुबली, त्यांची आई व चुलत्याचे लागोपाठ मृत्यू झाले.

पाटील कुटुंबावरील या आघाताने गावकरी हादरुन गेले. बाहुबली एका खासगी बँकेत नोकरी करत होते. वडिलांचे छत्र नसल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच होती, पण वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी कोरोनाने त्यांना काळाच्या पडद्याआड नेले. त्यांच्या पश्चात पत्नी, आठ वर्षाची मुलगी आहे. पती, सासू व चुलत सासऱ्यांच्या मृत्यूचा आघात त्यांच्यासाठी पेलण्यापलीकडे आहे. कोरोनाने आभाळाच फाटल्याने सांत्वन तरी कोण कोणाचे करणार? असा प्रश्न आहे.

चौकट

डॉक्टर, प्रयोगशाळेवर कारवाई करा

कोरोना संसर्ग लपवून इतरांचे कुटुंब उद्‌ध्वस्त करणाऱ्यांवर आरोग्य विभागाने कडक कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांनी केली. रुग्णाचा कोरोना अहवाल लपवणाऱ्या डॉक्टर व प्रयोगशाळेवरही शासनाने कारवाई करावी, असे ते म्हणाले.

Web Title: Corona kills three members of same family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.