कोरोनाने मृत मित्रावर केले मित्रांनीच अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:33 AM2021-06-09T04:33:06+5:302021-06-09T04:33:06+5:30
सांगली : कोरोनामुळे बळी गेलेल्या एकावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मित्रांवर आली. मिरजेच्या स्मशानभूमीत जड अंतकरणाने मित्रांनी त्याला अखेरचा निरोप ...
सांगली : कोरोनामुळे बळी गेलेल्या एकावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मित्रांवर आली. मिरजेच्या स्मशानभूमीत जड अंतकरणाने मित्रांनी त्याला अखेरचा निरोप दिला. हे दृश्य पाहून उपस्थितांची मने हेलावली.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार सुरुवातीला सांगलीतील गावभागात राहत होते. त्यांच्या घरासमोरच्या व्यक्तीशी त्यांची ओळख झाली. तो मित्र बनला. एकमेकांची सुख-दु:खात सहभागी होत या मित्रांनी आयुष्याची वाटचाल सुरू केली. इनामदार राजकारणासोबतच समाजकारणात सक्रिय झाले, तर या मित्राने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे नाव जोडले गेले. ही ३० वर्षांपासूनची मैत्री मंगळवारी तुटली.
या मित्राला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याच्या कुटुंबालाही कोरोनाने घेरले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. इनामदार यांच्याकडून दररोज मित्राची विचारपूस सुरू होती. गेल्या शुक्रवारीही त्यांचे बोलणे झाले होते. शनिवारी डिस्चार्ज मिळेल, असे सांगण्यात आले. पण शनिवारी मित्राची तब्येत बिघडली अखेर मंगळवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या घरातील लोकही कोरोनाबाधित असल्याने इनामदार, नगरसेवक संजय कुलकर्णी, दीपक माने, चंदू घुणके यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत पीपीई कीट घालून अंत्यविधी करत मित्राला अखेरचा निरोप दिला.