कोरोनाने महिलांपुढे निर्माण केले न सुटणारे प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:17+5:302021-06-04T04:21:17+5:30
सांगली : जिल्हा प्रशासनाने कोविड काळात सुरु केलेल्या विश्वास हेल्पलाईनवर महिन्याभरात ९ हजार ५३७ जणांनी मदतीसाठी फोन केले. कोरोनामुळे ...
सांगली : जिल्हा प्रशासनाने कोविड काळात सुरु केलेल्या विश्वास हेल्पलाईनवर महिन्याभरात ९ हजार ५३७ जणांनी मदतीसाठी फोन केले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व मानसिक कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा प्रशासनाने इस्लामपुरातील शुश्रूषा संस्थेच्या मदतीने विश्वास हेल्पलाईन सुरु केली आहे. कोरोना व लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे मानसिक समुपदेशन त्याद्वारे केले जाते. गेल्या काही महिन्यात हेल्पलाईन अखंड खणखणते आहे. कुटुंबातील सदस्यांचे मृत्यू, दुरावलेला शेजार यामुळे महिलांचे फोन विशेषत्वाने सुरु झाल्याची माहिती समुपदेशक कालिदास पाटील यांनी दिली. शासनाच्या मनोमित्र उपक्रमाद्वारे महिलांशी हितगुज केले जात आहे. पतीचे अकस्मात निधन, आई- वडिलांच्या जाण्याने आलेला पोरकेपणा, कर्जाचा वाढता डोंगर, मुलींचे वाढते वय आणि लग्नाचे प्रश्न अशा अनेक अडचणींना कोरोना काळात तोंड द्यावे लागत आहे. विश्वास हेल्पलाईनकडे आलेल्या कॉलपैकी ६० टक्के महिलांचे आहेत. मुलांना कोरोनाचा धोका, त्यांच्या शिक्षण व नोकरीचे प्रश्न याची चिंता त्या व्यक्त करत आहेत. स्नेहा कुलकर्णी, कविता पवार, डॉ. वर्षा सावंत, मेधा शिंदे, लता कांकरिया, धनश्री पुजारी असे मानसतज्ज्ञ त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम करत आहेत. समुपदेशनासाठी १८००१०२४७१० किंवा ९४२२६२७५७१ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
चौकट
कोरोनाने निर्माण केले न सुटणारे प्रश्न
पाठीशी ठामपणे उभे राहणारे सासू सासरे अचानक कोरोनाने हिरावले. आई- वडिलांचा मृत्यू झाल्याने माहेरपण संपले, मुले मामा -मावशीच्या गावाला पारखी झाली, मन मोकळे करायला हक्काची जागा उरली नाही अशा अनेक प्रश्नांनी महिला त्रस्त झाल्या आहेत. कोरोनाने त्यांच्यापुढे न सुटणारे प्रश्न निर्माण केले आहेत. याची दखल विश्वास हेल्पलाईनवर घेतली जात आहे.