जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १२.७५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:55+5:302021-06-05T04:20:55+5:30
सांगली : जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर १२.७५ टक्क्यांवर आला आहे. कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढत आहे. गुरुवारअखेर २०० वर गेली ...
सांगली : जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर १२.७५ टक्क्यांवर आला आहे. कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढत आहे. गुरुवारअखेर २०० वर गेली असून १० जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत ही माहिती देण्यात आली. आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले की, हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, १८ ते ४४ वर्षांवरील लाभार्थीं तसेच ४५ वर्षांवरील लाभार्थीं अशा एकूण ७ लाख ५ हजार ७४९ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, यामध्ये पहिला डोस ५ लाख ८६ हजार ८८३ जणांना तर दुसरा डोस १ लाख १८ हजार ८६६ जणांना देण्यात आला. कोरोनाचे १० हजार ९२९ रुग्ण उपचाराखाली आहेत. म्युकरमायकोसिसचे नवे ८ रुग्ण गुरुवारी आढळले.
सभापती आशा पाटील यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींच्या १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजातून २८ नव्या रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत. शासनाकडून ७ प्राप्त झाल्या आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून दिघंची व करगणी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका घेतल्या जाणार आहेत. विक्रमसिंह सावंत यांच्या आमदार निधीतून डफळापूर व संखला रुग्णवाहिका मिळतील. उदगिरी साखर कारखान्याच्या सामाजिक दायित्व निधीतून वांगी केंद्रासाठी रुग्णवाहिका मिळेल.
हिवताप अधिकारी शुभांगी अधटराव यांनी सांंगितले की, १ ते ३० जूनअखेर हिवताप जनजागरण मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व शहरी भागातील रुग्ण शोधून उपचार केले जातील.
चर्चेत आरोग्य सभापती आशा पाटील, निजाम मुलाणी, सरिता कोरबू, तम्मनगौडा रवी पाटील, रेश्मा साळुंखे, वैशाली कदम, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, क्षयरोग अधिकारी डॉ. एस. ए. जोशी आदींनी भाग घेतला.
चौकट
आरोग्य केंद्र इमारतींसाठी निधी
सभापती पाटील यांनी सांगितले की, आरोग्य केंद्र बांधकाम व विस्तारीकरणासाठी १४ कोटी ८३ लाख ३४ हजारांचा निधी मिळाला आहे. दुरुस्तीसाठी २ कोटी तसेच उपकेंद्र बांधकामासाठी ७ कोटी रुपये मिळाले आहेत.