जिल्ह्यात आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:04+5:302021-01-16T04:31:04+5:30
सांगली : गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा असलेल्या कोरोना लसीकरणास आज, शनिवारपासून प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात २६ हजार ...
सांगली : गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा असलेल्या कोरोना लसीकरणास आज, शनिवारपासून प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात २६ हजार ५०० जणांना लस देण्याचे नियोजन असून जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर लसीकरणाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.
आजपासून सुरू होणाऱ्या कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, शनिवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यांत १३ हजार ३५४ तर महानगरपालिका क्षेत्रांतील १३ हजार १३८ अशा एकूण २६ हजार पाचशे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल. प्रत्येकी दिवशी शंभरजणांना लस देण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यासाठी ३१ हजार डोस उपलब्ध झाले असून गुरुवारपासून लसीकरण केंद्रांवर त्याचे वितरण करण्यात आले आहे. लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांना मोबाईलवर लसीकरणाची तारीख व वेळेची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय ॲपच्या माध्यमातूनही माहिती मिळणार असल्याने लसीकरणाच्या नियोजनात अडचणी येणार नाहीत, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, डॉ. विवेक पाटील उपस्थित होते.
चौकट
याठिकाणी होणार लसीकरण
महानगरपालिका क्षेत्रात सांगली व मिरज शासकीय रुग्णालय वॉनलेस हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल आणि हनुमाननगर उपचार केंद्रात लसीकरण होणार आहे तर उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर व कवठेमहांकाळ, ग्रामीण रुग्णालय पलूस आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कवलापूर (ता. मिरज) या नऊ ठिकाणी लसीकरण केले जाईल.
चौकट
अठरा वर्षांवरील नागरिकांनाच लस
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, पहिली लस दिल्यानंतर २८ दिवसांनी त्याच लाभार्थ्यांस दुसरी लस दिली जाणार आहे. १८ वर्षांखालील मुलांना व गरोदर महिला, स्तनदा मातांना लस दिली जाणार नाही. सध्या आपल्या जिल्ह्यासाठी कोविशिल्ड ही लस मिळाली आहे.