जिल्हा परिषदेत कोरोनाचा पुन्हा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:35+5:302021-03-26T04:26:35+5:30
सांगली : जिल्हा परिषदेतही आता कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. बांधकाम विभागात एक कर्मचारी कोरोनाबाधित सापडल्याने गुरुवारी औषध फवारणी ...
सांगली : जिल्हा परिषदेतही आता कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. बांधकाम विभागात एक कर्मचारी कोरोनाबाधित सापडल्याने गुरुवारी औषध फवारणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीदेखील याच विभागात दोघे कर्मचारी कोरोनाबाधित सापडले होते.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढेल तसा जिल्हा परिषदेलाही संसर्ग होऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत रुग्णसंख्या कमी होताच जिल्हा परिषदेतील प्रतिबंधात्मक उपाययोजना गायब झाली. प्रवेशद्वारातील अभ्यागतांची तापमान तपासणी, नोंदणी व सॅनिटायजरचा वापर थांबला. जिल्हाभरातून लोकांची वर्दळ वाढली. त्यामुळे कोरोनाने पुन्हा शिरकाव केला. मंगळवारी बांधकाम विभागातील दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर गुरुवारी आणखी एकाला कोरोनाचा संसर्ग झाला. ताप आणि खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बांधकाम सभापतींचे कार्यालय व संबंधित कर्मचाऱ्यांच्या केबीनचे दुपारी निर्जंतुकीकरण करण्यात आले.
दरम्यान, जिल्हाभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना जिल्हा परिषदेत गर्दीचे कार्यक्रम थांबलेले नाहीत. सर्वसाधारण सभा, सभासमारंभ, बैठका यानिमित्ताने सभागृह भरल्याचे पाहायला मिळत आहे.