बोरगाव पोस्ट कार्यालयात कोरोना नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:52+5:302021-05-16T04:24:52+5:30
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील पोस्टमास्तर यांनी कोरोनाचे कारण देत सध्या पोस्टाची घरपोहोच सेवा बंद केली आहे. नागरिकांना ...
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील पोस्टमास्तर यांनी कोरोनाचे कारण देत सध्या पोस्टाची घरपोहोच सेवा बंद केली आहे. नागरिकांना पोस्टातच बोलाविले जाते. कार्यालयात पोस्ट कर्मचारी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. पोस्टमास्तर स्वत:च्या जिवाच्या सुरक्षेसाठी नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बोरगाव येथील पोस्टातील सर्व व्यवहार सुरू आहेत. पण येथे ना सॅनिटाझर ना काऊंटरला प्लॅस्टिक कागद आहे. सोशल डिस्टन्सिंग तर तेथे औषधालाही दिसून येत नाही. येथील पोस्टमास्तर स्वत:च मास्क वापरत नाही.
मात्र दुसऱ्या बाजूला ते कोरोनाच्या भीतीने चक्क नागरिकांना पोस्टात बोलावून घेत आहेत. गावातील कोणतेही टपाल, पार्सल अथवा पोस्टाचा व्यवहार असेल तर ते चक्क संबधित ग्राहकाला तुमचे टपाल आहे घेऊन जा असा फोन करून निरोप देतात. याबाबत संबंधित ग्राहकांनी घरपोहोच सेवेबाबत विचारणा केल्यावर कोरोनाचे कारण सांगितले जात आहे.
ग्राहक पोस्टात गेला की प्रथम पोस्टमास्तरच विनामास्कचे दिसतात. कर्मचारी मोकाट असतात. येथे ग्राहकांना ना सॅनिटायझरची सोय, ना कोणती सुरक्षितता पहायला मिळते. मग ग्राहकांना बोलावून त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकारी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना कोणी दिला, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
पोस्टमास्तर आर. एन. गायकवाड यांना याबाबत विचारले असता कोरोनामुळे आम्हाला वरिष्ठ पातळीवरून आदेश असल्याने आम्ही जागेवर बसून ग्राहकाला बोलावून सर्व कारभार करत असल्याचे त्यांनी सांगितले. सॅनिटायझरचा वापर करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोट
जे कोरोना रुग्ण आहे किंवा तेथील परिसर कंटेन्मेंट झोन केला आहे. अशाच ठिकाणी घरपोहोच सेवा दिली जात नाही. अन्यथा, इतर घरी सेवा द्यायचीच आहे. घरपोहोच सेवा बंद ठेवण्याबाबत सांगण्यात आले नाही.
- ए. आर. खोराटे, सांगली जिल्हा प्रवर्तक अधीक्षक