corona in Sangli: जिद्दीच्या जोरावर ९५ वर्षाच्या आज्जीची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:01 PM2021-05-06T12:01:39+5:302021-05-06T12:06:03+5:30
CoronaVirus Sangli : कुपवाड शहरातील शिवशक्तीनगरमधील ९५ वर्षाच्या मुक्ताबाई रामचंद्र कारंडे या आज्जीने जिद्द आणि सकारात्मकता दाखवून महापालिकेच्या रूग्णालयात वेळेवर आहार आणि औषधोपचार घेतल्याने कोरानावर विजय मिळविला.
कुपवाड : शहरातील शिवशक्तीनगरमधील ९५ वर्षाच्या मुक्ताबाई रामचंद्र कारंडे या आज्जीला कोरोना झाल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी खासगी दवाखान्याचे दरवाजे ठोठावले. पण आज्जीची प्रकृती ठीक नसल्याने खासगी दवाखान्यांनी त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर नातेवाईकांनी महापालिकेच्या डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी बेड शिल्लक नसल्याने होम आयसोलेट केल्यास उपचार करण्याची तयारी दर्शविली. आज्जीनेही जिद्द आणि सकारात्मकता दाखवून वेळेवर आहार आणि औषधोपचार घेतल्याने त्यांनी कोरानावर विजय मिळविला.
९५ वर्षीय आज्जी मुक्ताबाई कारंडे यांचे मुळ गाव खानापूर तालुक्यातील भांबर्डे हे आहे. त्या शिवशक्तीनगर येथे उपचारासाठी मुलीकडे राहतात. त्या विट्याला त्यांची मासिक पेन्शन आणण्यासाठी गेल्यावर त्यांच्या पॉझिटिव्ह आलेल्या मुलाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची कोरोनाची चाचणी २६ एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आली होती. शहरातील शिवशक्तीनगर येथील नातेवाईकांनी उपचारासाठी त्यांना सांगलीला आणले होते.
प्रारंभी आज्जींना महापालिकेच्या दवाखान्यात दाखविले. त्यानंतर त्याठिकाणी बेड शिल्लक नसल्याने त्यांनी खासगी दवाखान्यात पळापळ सुरू केली. खासगी दवाखान्यात आज्जीची आॅक्शीजन लेवल कमी असल्याने आणि प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर नातेवाईकांनी महापालिकेच्या डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी होम आयसोलेट केल्यास उपचार करण्याची तयारी दर्शविली. आज्जींना महापालिकेकडून उपचार मिळणार असल्याने नातेवाईकांनाही दिलासा मिळाला.
कोरोना होऊनही आज्जीनी कोरोनावर मात करण्याविषयीची कमालीची जिद्द आणि सकारात्मकता दाखवून आजाराला स्वतामध्ये भिनू दिले नाही. त्यांना महापालिकेचे कुपवाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर औंधकर, डॉ.अंजली धुमाळ यांच्यासह वैद्यकीय पथकाकडून वेळेवर योग्य औषधोपचार मिळाले. त्यांची महापालिकेच्या सिस्टर आणि आशा वर्कर यांनी दररोज तपासणी करून आधार दिला. नातेवाईकांनीही योग्य काळजी घेतल्यामुळे कारंडे आज्जींनी बुधवारी कोरोना आजारावर मात केली आहे.
कोरोना हा आजार बरा होणारा आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन उपचार करून घ्यावेत. तसेच संसर्ग रोखण्यासाठी घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे.
- नीरज उबाळे,
सहायक पोलीस निरीक्षक, कुपवाड पोलीस ठाणे
कोरोना झाल्यावर लवकर उपचार घेतल्यास कोरोना निश्चितपणे बरा होऊ शकतो. दुसऱ्या लाटेमध्ये रिकव्हरी रेट चांगला असून गृह अलगीकरणातील अनेक रूग्ण योग्य उपचार घेउन बरे होत आहेत.
- डॉ. मयूर औंधकर,
महापालिका वैद्यकीय अधिकारी, कुपवाड.