CoronaVirus: सीमा बंद असतानाही 'ती' मुंबईहून पोहोचली सांगलीला; सोबत नेला 'कोरोना'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 12:16 PM2020-04-25T12:16:40+5:302020-04-25T16:30:40+5:30
आजाराची लक्षणे आणि मुंबईहून आलेली पार्श्वभूमी पाहून त्यांना तातडीने मिरज येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शिराळा : निगडी (ता. शिराळा) येथे मुंबईहून आलेल्या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट झाले. संबंधित तरुणी आणि तिचा चुलत भाऊ १७ एप्रिलला मुंबईहून आले होते. तिच्या भावाचा चाचणी अहवाल अजून आलेला नाही. या दोघांसोबत सागाव येथील दोघांना मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल केले आहे. निगडी गावाची सीमा सील केली असून, त्यांच्या कुटुंबातील व संपर्कातील १२ जणांना मिरज येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले आहे.
निगडी येथील २३ वर्षीय तरुणी व २७ वर्षीय तरुण हे चुलत बहीण-भाऊ दि. १७ एप्रिलरोजी मुंबईहून स्वत:च्या वाहनाने गावी आले होते. ताप आल्याने दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्यावर शिराळा येथील रुग्णालयात व नंतर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार केले. मात्र दि. २३ रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
आजाराची लक्षणे आणि मुंबईहून आलेली पार्श्वभूमी पाहून त्यांना तातडीने मिरज येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्यांचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी या तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यानंतर प्रांताधिकारी नागेश पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी निगडी गावास भेट देऊन संपूर्ण गाव सील केले आहे.
दरम्यान, सागाव येथील दोन कुटुंबातील ३० वर्षीय पुरुष व २७ वर्षीय महिलेला त्रास होऊ लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, त्यांनाही मिरज येथे पाठवण्यात आले आहे. त्यांच्या आजाराच्या लक्षणांवरून त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे. सागाव येथील रुग्णांनी कोठेही प्रवास केलेला नाही, असे सांगण्यात आले आहे.
चौकशी सुरू
निगडीचे हे बहीण व भाऊ मुंबईहून इकडे कसे आले, त्यांना परवानगी कोणी दिली, याची चौकशी सुरू झाली आहे. त्यांना प्रशासनाने होम क्वारंटाईन केले होते. तरी त्यांचा काही जणांशी संपर्क आला आहे. यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिक, नातेवाईकांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार केले होते. तेथीलही काहीजणांची चौकशी सुरू आहे.