Corona in sangli : कोरोनामुळे कडेगावचा मोहरम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 02:35 PM2020-07-22T14:35:15+5:302020-07-22T14:40:47+5:30
२०० वर्षापासूनची परंपरा असलेला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा कडेगाव गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा मोहरम सण चालुवर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे.
कडेगाव : २०० वर्षापासूनची परंपरा असलेला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा कडेगाव गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा मोहरम सण चालुवर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे.
चालू वर्षी ऑगस्ट मध्ये येणारा मोहरम साजरा होणार नसला तरी येथील हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम राहील असा विश्वास हिंदू मुस्लिम बांधवांनी दिला
आहे.
कडेगाव येथे कडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सोशल डिस्टन्सचे पालन करीत बैठक पार पडली.या बैठकुट कडेगाव मोहरम ताबूत मालक व मोहरम ताबूत कमिटी यांनी हा एकमुखी निर्णय घेतला.
यावेळी कडेगावच्या नागराध्यक्षा नीता देसाई ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस उपस्थित होते.
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणारा कडेगाव मोहरम सणानिमित्त उंच ताबूत बांधकामाचा शुभारंभ बकरी ईद दिवशी करण्यात येते.परंतु चालुवर्षी कोरोना या महामारी आजाराने संपूर्ण जग त्रासले गेले आहे.
याचा मोठा परिणाम देशात ,राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यातही झाला आहे. त्यामुळे चालुवर्षी गगनचुंबी ताबूतांचा मोहरम सण या महामारी आजारामुळे रद्द करण्यात आला आहे.
कडेगाव येथील मोहरम सण संपूर्ण भारतात उंच ताबुतांसाठी आणि हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे मोहरम निमित्त 14 उंच ताबूत बसविले जातात. त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात.स्वतः देशपांडे यांचाही ताबूत असतो.
या शिवाय सुतार, शेटे वगैरे हिंदू बांधवांचेही ताबूत असतात. येथील मोहरमचा संपूर्ण मान हिंदू बांधव म्हणजे देशपांडे, कुलकर्णी ,सुतार, शेटे ,शिंदे, देशमुख, माळी वगैरे कडेगावातील हिंदू बांधवांकडे असतो.
ताबूत बांधकामास जवळजवळ एक महिना लागतो. जवळपास 1 ते 23 माजले ताबुतांमध्ये असतात.ताबुतांची उंची सुमारे 110 ते 135 फुटापर्यंत असते.
दरम्यान संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला गगनचुंबी मोहरम ताबूतांचा सण चालुवर्षी रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेगाव मोहरम ताबूत मालक ,मोहरम कमिटी व नागरिकांनी प्रशासनाला सर्वोत्तपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली. तर कडेगाव नागरिकांचा हा निर्णय आदर्शवत असल्याचे पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस व नगराध्यक्षा नीता देसाई यांनी सांगितले.
यावेळी धनंजय देशमुख , साजिद पाटील ,निखिल देशपांडे ,संतोष डांगे ,राजू दीक्षित ,सिराज पटेल ,फिरोज बागवान ,नासिर पटेल ,मुराद कडेगावकर , राजू इनामदार ,समीर अत्तार ,नजीर अत्तार यांच्यासह ताबूत मालक व नागरिक उपस्थित होते.