महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:35+5:302021-06-01T04:20:35+5:30
सांगली : कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेचे नगरसेवक, कर्मचाऱ्यांना बाधा झाली होती. आता दुसऱ्या लाटेत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. ...
सांगली : कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेचे नगरसेवक, कर्मचाऱ्यांना बाधा झाली होती. आता दुसऱ्या लाटेत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकाऱ्यांनी पाॅझिटिव्ह आल्यानंतर माहिती न लपविता जनतेसाठी जाहीर करावी, अशी मागणी मनसेचे आशिष कोरी यांनी केली आहे.
गतवर्षी महापालिकेचे २५ हून अधिक नगरसेवक कोरोनाबाधित झाले होते. याशिवाय सहायक आयुक्तांपासून ते स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांना कोरोना बाधा झाली. काही कर्मचाऱ्यांचा या महामारीत बळीही गेला. या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्यावतीने दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदानही देण्यात आले. आता दुसऱ्या लाटेतही महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाचा विळखा बसला आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे; पण याबाबत अधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे.
दरम्यान, मनसेचे आशिष कोरी यांनी अधिकारी कोविड पॉझिटिव्ह असल्यास त्यांनी स्वेच्छेने जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकाऱ्यांचा इतर कर्मचारी व जनतेशी थेट संपर्क येतो. ते जर पाॅझिटिव्ह असतील तर त्यांनी जाहीर करून संपर्कातील लोकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले पाहिजे. याबाबत शासनस्तरावरून नियमावली जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे कोरी यांनी सांगितले.