‘कृष्णे’त सहकार पॅनेलला कोरोना सेवेचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:59+5:302021-07-03T04:17:59+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भाेसले यांचा ...
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भाेसले यांचा पाच वर्षांतील कारभार आणि कृष्णा मेडिकल ट्रस्टची दोन वर्षांतील सेवा पाहून सभासदांनी सहकार पॅनेलला पुन्हा एकदा मतपेटीतून कौल दिला.
डॉ. भाेसले यांनी गेल्या पाच वर्षांत आर्थिक संकटात सापडलेल्या कारखान्याला पुन्हा उभारी आणली. सक्षम कारखान्यांच्या बरोबरीला नेऊन ठेवले. योग्य व्यवस्थापन, नियंत्रण, काटकसर यामुळे ऊस उत्पादकाला वेळेवर बिले देण्यात आली. ऊस दरातही तडजोड केली नाही. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला.
दोन वर्षापासून रयत पॅनेलच्या डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सोशल मीडियावर सहकार बुडत असल्याच्या पोस्ट टाकून यशवंतराव मोहिते यांचे विचार जपण्याबाबत आवाहन केले होते. त्यामध्ये कृष्णा मेडिकल ट्रस्टचा मुद्दाही होता. परंतु गेल्या दोन वर्षांतील कोरोनाकाळात हा ट्रस्ट वाळवा, कऱ्हाड आणि कडेगाव तालुक्याला वरदान ठरला. कृष्णा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयातून कोरोनाचे हजारो रुग्ण बरे झाल्याचे सभासदांना दिसून आले. त्याचाही परिणाम मतदानावर झाला. सहकार पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला.
संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा प्रारंभ केला. यामध्ये काटामारी हा मुद्दा घेऊन सहकार पॅनेलला लक्ष्य केले. मात्र त्याचा म्हणावा तितका परिणाम झाला नाही. परंतु अविनाश मोहिते यांचा गेल्या पाच वर्षांत तळागाळातील सभासदांशी संपर्क असल्याने त्यांचे पॅनेल दुसऱ्या क्रमांकावर आले.
चौकट
जयंत पाटील यांच्या तटस्थ भूमिकेने सहकार पॅनेलला बळ
रयत पॅनेलला राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी जाहीर पाठिंबा दिला. ते स्वत: थेट प्रचारात उतरले. परंतु फारसा परिणाम झाला नाही. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या तटस्थ भूमिकेमुळे सहकार पॅनेलला राष्ट्रवादीची ताकद मिळाली. या तालुक्यातून निवडून आलेले सहा संचालक जयंत पाटील गटाचे समर्थक, तर एक महाडिक गटाचे आणि एक काँग्रेसचे आहेत.