सांगली जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:46 AM2021-02-18T04:46:31+5:302021-02-18T04:46:31+5:30
सांगली : राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच, सांगली जिल्ह्यात मात्र स्थिती नियंत्रणात आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात ...
सांगली : राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच, सांगली जिल्ह्यात मात्र स्थिती नियंत्रणात आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सरासरी १० ते १५ रुग्ण सापडत आहेत, तर त्यापेक्षा अधिक रुग्ण बरे होत आहेत. गेल्या दहा दिवसात कोरोनाने आतापर्यंत एकच मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरूच ठेवले आहेत. या आठवड्यात जिल्हा परिषदेतर्फे भावे नाट्यगृहात एक कार्यक्रम पार पडला. त्यास पालकमंत्री जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास मोठी गर्दी होती. अनेकांनी मास्क घातले नव्हते. याशिवाय भाजपच्या कोअर कमिटी बैठकीलाही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शाळा, महाविद्यालये चालू झाली असली तरी तेथील गर्दी अद्यापही कमी आहे. तसेच जिल्ह्यातील धार्मिक ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. गेल्या चार दिवसात १० ते १३ अशी रुग्णसंख्या कायम आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी, मास्कचा वापर, सामाजिक अंतर ठेवण्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.