कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नसल्यामुळे ग्रामीणमध्ये कोरोना सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:31+5:302021-04-15T04:25:31+5:30
सांगली : ग्रामीण भागातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्यामुळे हे रुग्णही ...
सांगली : ग्रामीण भागातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्यामुळे हे रुग्णही बिनधास्त फिरत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. आरोग्य विभाग, शासकीय यंत्रणा काम करीत आहे; पण त्यांना गावकऱ्यांनीच शिस्त दाखविण्याची गरज आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील साडेतीनशे गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले होते. तशीच शिस्त आता गावकऱ्यांनी दाखविल्याशिवाय कोरोनाचा फैलाव रोखणे शक्य नाही.
रुग्णांची संख्या भरमसाट वाढल्याने गावांची आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये चाचण्या होत आहेत. संक्रमण जास्त नसलेल्या रुग्णांना औषधे पुरविण्यात येत आहेत. पण संक्रमण वाढलेल्या रुग्णांना थेट जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेतल्यास बेडची संख्याही अपुरी पडत असल्यामुळे प्रत्येक नागरिकांनीच स्वत:ला शिस्त लावण्याची गरज आहे.
चौकट
दृष्टिक्षेपात...
- जिल्ह्यात एकूण रुग्ण : ५०४४४
- ग्रामीणमध्ये एकूण रुग्ण : २९०९१
- गावांमध्ये होम आयसोलेशन रुग्ण : ३१९१
चौकट
कोरोनाचा लढा सुरू आहे व्हिटॅमिनच्या गोळ्यांवर
पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या जातात. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात ऑक्सिजनची सोय आहे. ग्रामीण भागामध्ये रेमडेसिविर, फॅबीफ्लू यासारखी औषधे मिळत नसल्याच्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत.
चौकट
आशा वर्कर्स, आरोग्य सेविकांचा वॉच
- ग्रामीण भागात खऱ्याअर्थाने काम करणारी यंत्रणा म्हणजे आशा वर्कर्स व आरोग्य सेविका होय. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन किंवा दूरध्वनीवरून ही यंत्रणा त्यांची दररोजची स्थिती जाणून घेत आहे.
- अंगणवाडी सेविकाही प्रामाणिकपणे काम करीत आहेत. या सेविका नेहमीच गावातील होम आयसोलेशन रुग्णांवर लक्ष ठेवत आहेत.
चौकट
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नावालाच
- रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी केली जाते. या प्रक्रियेला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतात. आरोग्य यंत्रणा अपुरी असल्याने तसे होत नाही. एखाद्या रुग्णालाच तुमच्या संपर्कात कोण आले होते, अशी विचारणा आरोग्य विभागाचे कर्मचारी करीत आहेत. त्यातून संबंधितांना कोरोना तपासणी करण्याची सूचना दिली जाते.
- काहीजण सरकारी चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर खासगीमध्ये दुसऱ्यांदा टेस्ट करतात. त्यादरम्यान संपूर्ण गावाच्या संपर्कात येतात. गृह विलगीकरणात रुग्णाला ठेवल्यास छोटे घर असल्याने उद्देश साध्य होत नाही.
कोट
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे. आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढा देत आहे. परंतु, कोरोनाविरोधी लढ्यात सर्वांनीच सहकार्य केले पाहिजे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांनी बाहेर फिरणे चुकीचे आहे. असे एखाद्या गावात दिसून आल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे कामही चालू आहे.
-डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद