कोरोनामुळे लगीनघरासह मंगल कार्यालयवाले धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:29 AM2021-03-01T04:29:12+5:302021-03-01T04:29:12+5:30
ओळ : इस्लामपूर येथे चार ते पाच हजार क्षमता असलेल्या सर्जेराव यादव यांच्या मंगल कार्यालयात फक्त पन्नासच्या आसपासच पाहुणे ...
ओळ : इस्लामपूर येथे चार ते पाच हजार क्षमता असलेल्या सर्जेराव यादव यांच्या मंगल कार्यालयात फक्त पन्नासच्या आसपासच पाहुणे उपस्थित होते.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : मागील वर्षातील कोरोनाच्या आर्थिक फटक्यातून अद्याप सावरत नाही, तोपर्यंत लग्नकार्यालयांसह लगीनघरही नव्या वर्षातील कोरोना संकटाने धास्तावले आहे. लॉकडाऊनच्या भीतीसह मयार्दीत वऱ्हाडींसह मंगलकार्य आटोपते घेण्याच्या अटीमुळे त्यांची तारांबळ उडाली आहे.
राज्यात कोरोनाचा कहर हळूहळू वाढत आहे. २०१९-२०मध्ये कोरोनाच्या संकटामुळे झालेल्या लॉकडाऊनचा आर्थिक फटका उद्योगांसह समाजातील सर्व घटकांना बसला आहे. आता २०२१मध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे ज्याच्या घरात लग्नकार्य आहे तो आणि कार्यालयवाले नियमांचे पालन करूनच आपले कार्य सिद्धीस नेत आहेत.
ऑक्टोबर २०२०च्या दरम्यान कोरोनाचा कहर ओसरला होता. देशासह राज्यात असलेल्या लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातील उद्योग रूळावर येऊ लागले. दळण-वळणाला गती आली. काही नियम पाळून कार्यालये, हॉटेल आदी व्यवसाय रुळावर येऊ लागले. जानेवारी २०२१चा पूर्ण महिन्यात सर्व काही सुरळीत झाल्याचे चित्र तयार झाले होते.
फेब्रुवारी २०२१च्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. आता मार्च २०२१च्या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने शासनाने काही व्यवसायावर निर्बंध घातले. यामध्ये सभा, लग्नसमारंभ, आंदोलने आदींचा समावेश आहे. लग्नसमारंभात ५० लोकांनाच संमती देण्यात आली. याचे नियम लग्नमालकासह कार्यालय यांनीही पाळावेत, असा स्पष्ट आदेश असल्याने पुन्हा कोरोनाच्या विळख्यात आणि लॉकडाऊनमध्ये सापडू नये यासाठीच विशेषत: जनजागृती होत आहे.
चौकट
सर्जेराव यादव यांनी घेतली दक्षता
उद्योजक सर्जेराव यादव यांची कन्या डॉ. सुरभि हिचा विवाह त्यांनी स्वत:च्या मंगल कार्यालयात पार पडला. यादव यांनी सर्व नियमांचे पालन आणि नियोजन करून समारंभास ५०हून अधिक पाहुणे असू नयेत, याची दक्षता घेतली आणि लग्नसमारंभ पार पाडला. हाच आदर्श इतरांनी घ्यावा. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही.