कोरोना चाचणीतील घोळ गर्भवतीच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 06:22 PM2020-09-09T18:22:19+5:302020-09-09T18:26:00+5:30
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्हचा घोळ दिवसभर सुरू होता. या घोळात एका गर्भवती महिलेचा जीव टांगणीला लागला होता. अखेर खासगी प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या महिलेचे कुटुंब दिवसभर तणावात होते.
सांगली : कोरोना चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्हचा घोळ दिवसभर सुरू होता. या घोळात एका गर्भवती महिलेचा जीव टांगणीला लागला होता. अखेर खासगी प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या महिलेचे कुटुंब दिवसभर तणावात होते.
काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण या कुटुंबाच्या मदतीला धावून आले. अखेर मंगळवारी सकाळी या महिलेची प्रसुती झाली आणि या कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला.
शहरातील गर्भवती महिलेला सोमवारी सकाळी नऊ वाजता प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्याची तयारी कुटुंबियांनी केली. तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. या कुटुंबाने नगरसेवक चव्हाण यांच्याशी संपर्क केला.
चव्हाण यांनी अँटिजेन चाचणीसाठी महिलेला महापालिकेच्या रुग्णालयात नेले. तिथे अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली. गर्भवती महिलेला कोरोना झाल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांना रडू कोसळले. चव्हाण यांनी कुटुंबियांना धीर देत खासगी प्रयोगशाळेमध्ये चाचणीचा सल्ला दिला. दिवसभर कुटुंबीय तणावाखाली होते.
सायंकाळी महिलेचा स्वॅब खासगी लॅबकडे देण्यात आला. त्याचा अहवाल मंगळवारी सकाळी आला. तो निगेटिव्ह होता. हा अहवाल घेऊन कुटुंबियांनी प्रसुतीसाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. सकाळी तिने एका मुलीला जन्म दिला. गर्भवती महिला व तिचे कुटुंबीय सोमवारी दिवसभर काळजीत होते. आता अँटिजेन चाचणी खरी, की लॅबची चाचणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसऱ्या एका घटनेत महापालिकेच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पण सोमवारी दिवसभर त्याला साधा बेडही मिळाला नाही. शेवटी या कर्मचाऱ्याला होम आयसोलेशन करण्यात आले. त्यातच मंगळवारी मिरजेतील स्वच्छता निरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता राबणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाºयाची अवस्था बिकट झाली आहे. यावर चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.