आष्टा ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:24 AM2021-03-06T04:24:51+5:302021-03-06T04:24:51+5:30
आष्टा ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची लस घेताना सांगली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी. लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा ...
आष्टा ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची लस घेताना सांगली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालयात जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मधुमेह व रक्तदाब असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांसह व ६० वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. सर्वांनी ऑनलाइन माहिती भरून आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष निगडी यांनी केले आहे.
आष्टा शहरात कोरोनाचे संकट वाढत असताना अनेक सेवाभावी संस्थांनी व व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयाला मदतीचा हात दिला. या ठिकाणी ३० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी दाखल झालेला एकही रुग्ण दगावला नाही. या ठिकाणी कोविडच्या चाचण्याही घेण्यात आल्या.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी, आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सिद्ध यांच्यासह सुमारे ७५० नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे.
आष्टा ग्रामीण रुग्णालयात डॉ. संतोष निगडी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, बी. बी. कांबळे, जयश्री मोहिते, सुलताना जमादार व सहकारी लसीकरण मोहिमेत सेवा देत आहेत.