जिल्ह्यात ४५ वर्षांवरील १४.५० लाख लाभार्थींना एप्रिलपासून कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:25 AM2021-03-26T04:25:54+5:302021-03-26T04:25:54+5:30
सांगली : जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस उपलब्ध होणार असून, एकूण साडेचौदा लाख लाभार्थी आहेत. त्यासाठी ...
सांगली : जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस उपलब्ध होणार असून, एकूण साडेचौदा लाख लाभार्थी आहेत. त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून, अधिकाधिक लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची दररोज वाढणारी संख्या पाहता, ४५ वर्षांवरील सर्वांना लस देणे फायद्याचे ठरेल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. सध्या ६० वर्षांवरील सर्वांना व ४५ ते ५९ दरम्यानच्या व्याधीग्रस्तांना लस टोचली जात आहे. सुरुवातीला लसीकरणाला प्रतिसाद नव्हता, पण गेल्या पंधरवड्यापासून लस घेण्यासाठी गर्दी होत असून, एक लाखाहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. शासकीय व खासगी ११० केंद्रात लस टोचण्याची सोय उपलब्ध केली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल, तेव्हा गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तरीही सध्याची केंद्रे पुरेशी ठरतील, असे डॉ. साळुंखे म्हणाले.
४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाविषयी शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, मात्र सध्याच्या पद्धतीनुसारच ती टोचली जाणार आहे. नागरिकांना कोविन ॲपवर नोंदणी करावी लागेल, त्यावरून मिळालेल्या वेळेत जवळच्या आरोग्य केंद्रात लस घेता येईल. थेट केंद्रात जाऊन आधार कार्डद्वारे नोंदणीचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. गर्दी नसलेल्या ठिकाणी त्याचदिवशी लस टोचून घेणे शक्य आहे.
लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले की, लोकसंख्येच्या सुमारे ४० ते ४५ टक्के लोक ४५ वर्षांवरील वयाचे आहेत. त्यानुसार साडेचौदा लाख लोकांना लस टोचावी लागणार आहे. आतापर्यंत दीड लाख लसींचे डोस मिळाले आहेत. मागणी वाढेल त्यानुसार आणखी लस येईल.
चौकट
अगोदरच सुरू झाले लसीकरण
सध्या ६० वर्षांवरील सर्वांना व ४५ ते ५९ वर्षांदरम्यानच्या व्याधीग्रस्तांना लस मिळते. पण काही ठिकाणी व्याधी नसतानाही ४५ ते ५९ दरम्यानच्या नागरिकांनी लस घेतल्याचे आढळले आहे. आरोग्याधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. डॉक्टरांवर दबाव टाकून, वशिलेबाजीने किंवा व्याधीची खोटी प्रमाणपत्रे दाखवून त्यांनी लस घेतली आहे.
पॉईंटर्स
- ४५ वर्षांवरील लोकसंख्या - सुमारे १४ लाख ५० हजार
- आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण - १ लाख १२ हजार ९३७
- साठ वर्षांवरील लस घेतलेले लाभार्थी - ६३ हजार ४२१
- ४५ ते ५९ वर्षांचे लस घेतलेले व्याधीग्रस्त - १४ हजार १२४
- जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेले डोस - १ लाख ५० हजार
- लसीकरण सुरू असणारी केंद्रे - ११०
कोट
१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी सध्याची केंद्र संख्या पुरेशी ठरेल. आधारकार्डद्वारे लाभार्थ्यांची नोंदणी करून लस टोचली जाईल. लसीकरणाविषयी शासनाकडून नेमके मार्गदर्शन अद्याप मिळालेले नाही, पण अधिकाधिक लाभार्थ्यांना लस टोण्याचे उद्दिष्ट आहे.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक