‘आयसेरा’ची कोरोना लस तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:24 AM2021-03-28T04:24:44+5:302021-03-28T04:24:44+5:30
शिराळा (जि. सांगली) : येथील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘अँटिकोविड सिरम’ नावाखाली कोरोनाची लस बनवली आहे. प्लाझ्मा ...
शिराळा (जि. सांगली) : येथील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘अँटिकोविड सिरम’ नावाखाली कोरोनाची लस बनवली आहे. प्लाझ्मा थेरपी जर यशस्वी होत असेल, तर घोड्याच्या रक्तामध्ये प्रतिपिंडे तयार करून ती रुग्णाला दिल्यास तो हमखास बरा होईल, याचा अभ्यास करून या लशीची निर्मिती झाली आहे. मात्र ती चाचण्या घेण्यासाठीच्या परवानगी प्रक्रियेत अडकली आहे. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर ही लस प्रभावी ठरेल याची खात्री संस्थेच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.
शिराळा येथील एमआयडीसीमध्ये ही कंपनी आहे. चीनमध्ये ज्या प्रतिजैविकाच्या वापराने मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले, त्याचाच वापर ही लस बनवताना कंपनीने केला आहे. सर्पदंश, रेबीज, धनुर्वात, घटसर्प, विंचू दंश आदीवरील प्रतिपिंडे घोड्याच्या रक्तापासून बनविली जातात व रोग्याला दिली जातात. अशी औषधनिर्मिती गेल्या कित्येक दशकापासून होत आहे. प्लाझ्मा थेरपी जर यशस्वी होत असेल तर घोड्याच्या रक्तामध्ये ही प्रतिपिंडे तयार करून रुग्णास दिल्यास तो हमखास बरा होईल याची खात्री देता येते. याचा अभ्यास करून सध्या ही प्रतिपिंडे येथील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने, सिरम इन्स्टिट्यूट, प्रीमिअम सिरम यांच्या संयोगाने बनवली आहेत.
कोरोनाला हरविण्यासाठी प्रताप देशमुख, दिलीप कुलकर्णी, नंदकुमार यादव, धैर्यशील यादव यांची आयसेरा कंपनी पुढे सरसावली आहे. सरकारने या औषधाच्या चाचण्या घेण्यासाठी प्राथमिकता देणे आवश्यक आहे. हे औषध उपलब्ध झाल्यास अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचणार आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर तसेच गंभीर रुग्णांसाठीही ते प्रभावी ठरेल, असा दावा संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
चौकट
प्लाझ्माऐवजी अँटिकोविड सिरम उपलब्ध झाल्यास संजीवनीसारखे ठरेल. हे औषध अत्यंत कमी मात्रेमध्ये टोचले तरी गुण येण्यास मदत होईल. आयसीएमआर व सरकारने परवानगी देऊन हे औषध कसे उपलब्ध करता येईल याबाबत सहकार्य करावे. सध्या चार लाख लस तयार आहेत. चाचणीची परवानगी मिळाल्यास महिन्याला १५ ते २० लाख लस तयार करण्यात येतील.
- दिलीप कुलकर्णी, संचालक, आयसेरा व माजी वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट प्रीमिअम, सिरम