Corona vaccine- कोरोना लसीविषयी मंत्रीमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 02:51 PM2021-05-08T14:51:37+5:302021-05-08T14:53:38+5:30
CoroanVirus Sangli : कोरोनाबाधितांसाठी व्हेन्टिलेटरचा सरसकट वापर चुकीचा आहे. त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करुन व्युहरचना ठरविणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. कोरोना लसीची टंचाई असून मंत्रीमंडळ बैठकीत याविषयी धोरणात्मक निर्णय होणार आहे. जिल्ह्यासाठी आठवडाभरात आणखी ५० व्हेन्टिलेटर उपलब्ध होणार आहेत असे त्यांनी सांगितले.
सांगली : कोरोनाबाधितांसाठी व्हेन्टिलेटरचा सरसकट वापर चुकीचा आहे. त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करुन व्युहरचना ठरविणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. कोरोना लसीची टंचाई असून मंत्रीमंडळ बैठकीत याविषयी धोरणात्मक निर्णय होणार आहे. जिल्ह्यासाठी आठवडाभरात आणखी ५० व्हेन्टिलेटर उपलब्ध होणार आहेत असे त्यांनी सांगितले.
ऑक्सिजनचा कोठेही तुटवडा नसल्याचा व १२०० रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध असल्याचा दावाही डॉ. कदम यांनी केला. ते म्हणाले की, ऑक्सिजन बेड आहेत, पण ऑक्सिजनचा आणि व्हेन्टिलेटरचा वापर चुकत आहे. त्यावर निर्बंध गरजेचे आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांसाठीच व्हेन्टिलेटर वापरावा.
ऑक्सिजन टंचाई कमी करण्यासाठी पुण्यातून दररोज ४४ टन पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. मिरज कोविड रुग्णालय व अन्य खासगी रुग्णालयांत मिळून १२०० रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध आहेत. नियोजन समितीच्या अंदाजपत्रकातून १० टक्के निधी कोविड कामांसाठी राखीव असून त्याव्दारे ३२ कोटी रुपये मिळतील.
मिरज, जत, माडग्याळ, चिंचणी-वांगी, आटपाडी, विटा आदी रुग्णालयांत जंबो सिलिंडर वाढविणार आहोत. येत्या शनिवारपर्यंत ५० व्हेन्टिलेटर मिळतील, त्यातून मिरज कोविड रुग्णालयाला २५, सांगली रुग्णालयाला २० दिले जातील. नियोजन समितीच्या निधीतून १५ व्हेन्टिलेटर मिळतील. सर्वाधिक व्हेन्टिलेटर असणार्या राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये सांगलीचा समावेश आहे.
डॉ. कदम म्हणाले की, आजारावर घरातच उपचार घेणारे रुग्ण प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात येतात, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. कोरोना लसीची टंचाई असून मंत्रीमंडळ बैठकीत याविषयी धोरणात्मक निर्णय होणार आहे. उपलब्ध लसीतून दुसरा डोस देण्याला प्राधान्य राहील. लसीसाठी महाराष्ट्राला झुकते माप द्यावे अशी मागणी आहे.
भारतीमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
सांगली व पुण्यात भारती रुग्णालयांत प्रत्येकी साडेचार कोटी रुपये खर्चाचे तीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रत्येक प्रकल्पात मिनिटाला ५०० लिटर द्रवरुप ऑक्सिजन निर्मिती होईल. महिन्याभरात प्रकल्प कार्यान्वित होतील. गरजेनुसार अन्य रुग्णालयांनाही ऑक्सिजन पुरविला जाईल असे डॉ. कदम म्हणाले.