कोरोनाने गेला बळी, मृत्यू दाखल्यासाठी जातोय जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:39 AM2021-02-26T04:39:40+5:302021-02-26T04:39:40+5:30
सांगली : अनेकांच्या जीवनात रंगाचा बेरंग करणाऱ्या कोरोनाचे चटके अजूनही नागरिकांना सोसावे लागत आहेत. कोरोनाने बळी गेलेल्या लोकांचे मृत्यू ...
सांगली : अनेकांच्या जीवनात रंगाचा बेरंग करणाऱ्या कोरोनाचे चटके अजूनही नागरिकांना सोसावे लागत आहेत. कोरोनाने बळी गेलेल्या लोकांचे मृत्यू दाखले मिळविताना आता नातेवाइकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. महापालिका क्षेत्रातील अनेक खासगी रुग्णालयांनी महापालिकेला मृत्यूवार्ता न दिल्याने दाखल्यांसाठी मृतांच्या नातेवाइकांना रुग्णालय व महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
कोरोनाच्या महामारीचा कहर जिल्ह्यात सप्टेंबरपासून सुरू झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. रुग्णांना बेड मिळविले मुश्कील झाले होते. जिल्ह्यात आजवर १ हजार ७५७ लोकांचे बळी कोरोनाने घेतले. सांगली शहरातील काही रुग्णालयांनी त्यांच्याकडील मृत्यूची नोंद महापालिकेला आजअखेर कळविली नव्हती. घरच्या सदस्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरल्यानंतर जेव्हा शासकीय कामासाठी मृत्यू दाखला मागण्यास हे नातेवाईक गेले तेव्हा त्यांना रुग्णालय व महापालिकेतील समन्वयाचा गोंधळ कळाला. रुग्णालयांनी फॉर्म २ व फॉर्म ४ भरून न दिल्याने अशा मृत्यूंच्या नोंदीच महापालिकेकडे झाल्या नाहीत. त्यामुळे संबंधितांचा मृत्यूचा दाखला देणे कठीण झाले आहे. नातेवाइकांना मात्र यामुळे मनस्ताप व मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.
चिंचणी (ता. तासगाव) येथील एका रुग्णाचा मृत्यू तीन महिन्यांपूर्वी झाला होता. नातेवाइकांनी महापालिकेकडे मृत्यूचा दाखला मागितल्यानंतर त्यांनी नोंदीचा शोध घेतला असता संबंधित नावाची कोणतीही नाेंद नसल्याचे सांगितले. रुग्णालयाशी संपर्क साधला असता त्यांनीही फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना नेमके काय करायचे हे समजले नाही. दुसरीकडे सर्व प्रकारची शासकीय कामे त्यामुळे अडली होती. चिंचणीतील केवळ एकाच व्यक्तीचा हा विषय नव्हता, तर त्यांना असे समदु:खी अनेक भेटले.
चौकट
अधिकाऱ्यांकडून अपेक्षा
चिंचणी येथील रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितले की, मृत्यूच्या दाखल्यांचा हा गोंधळ थांबवून मृतांच्या नातेवाइकांना न्याय देण्यासाठी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.
चौकट
काय आहेत अडचणी
एखादा कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला रेशनवरील धान्य मिळत नाही. बँकेतील व्यवहार अडले आहेत. जमिनीचे व इतर मालमत्तेचे व्यवहार करता येत नाहीत. या सर्व अडचणींचा सामना मृतांच्या नातेवाइकांना करावा लागत आहे.