corona virus : महापालिका कोविड सेंटरमधून १६७ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:59 PM2020-09-07T14:59:10+5:302020-09-07T15:01:15+5:30
महापालिकेच्या आदिसागर कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ३०८ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी १६७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या कोविड सेंटरमधील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही फार मोठी दिलासा देणारी बाब आहे.
सांगली : महापालिकेच्या आदिसागर कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ३०८ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी १६७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या कोविड सेंटरमधील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही फार मोठी दिलासा देणारी बाब आहे.
महापालिका क्षेत्रात जुलै महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाला. तत्पूर्वी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत केवळ २४ कोरोना रुग्ण होते. जुलैमध्ये मात्र हा आकडा हजाराच्या घरात पोहोचला. दररोज २०० ते ३०० रुग्ण सापडू लागल्याने महापालिकेची यंत्रणाही हादरली होती. रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
आॅक्सिजन बेडचाही तुटवडा जाणवत होता. नगरसेवक अभिजित भोसले यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. आयुक्तांनी त्याला तात्काळ प्रतिसाद दिला. त्यानंतर जागेचा शोध सुरू झाला. महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आदिसागर मंगल कार्यालयात १२० बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अवघ्या सात दिवसात महापालिकेच्या यंत्रणेने दिवस-रात्र राबून कोविड हेल्थ सेंटर सुरू केले. या सेंटरमध्ये १०० आॅक्सिजन बेड व २० संशयित रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या. कोविड सेंटर सुरू होताच चार ते पाच दिवसातच ते हाऊसफुल्ल झाले. या सेंटरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.
महापालिकेकडून औषध, जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे रुग्णालय कोविड रुग्णांसाठी वरदान ठरू लागले आहे. गेल्या पंधरा दिवसात या सेंटरमध्ये ३०८ जण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी १६७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर ६६ जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना इतर रुग्णालयांत स्थलांतरित करण्यात आले आहे.
दररोज हजार लिटर आॅक्सिजनचा वापर
आदिसागर कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचे १०० बेड्स आहेत. या बेड्सना दररोज एक हजार लिटर आॅक्सिजनची गरज भासत आहे. महापालिकेने तीन आॅक्सिजनचे टँक उभारले आहेत. दररोज दीड ते दोन हजार लिटर आॅक्सिजन मागविला जातो. सकाळच्या टप्प्यात आॅक्सिजनची मात्रा कमी लागते. पण रात्रीच्यावेळी आॅक्सिजन जादा द्यावा लागत असल्याचे सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी सांगितले.