corona virus :सांगली जिल्ह्यात ६१ जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 01:11 PM2020-07-18T13:11:25+5:302020-07-18T13:12:50+5:30
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी ६१ ने वाढ झाली, तर वाळवा तालुक्यातील कामेरी येथील ५८ वर्षीय पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहरात शुक्रवारी २३, तर महापालिका क्षेत्रात ३४ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील १३ जण कोरोनामुक्त झाले.
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी ६१ ने वाढ झाली, तर वाळवा तालुक्यातील कामेरी येथील ५८ वर्षीय पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहरात शुक्रवारी २३, तर महापालिका क्षेत्रात ३४ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील १३ जण कोरोनामुक्त झाले.
कामेरी येथे ११ जुलैरोजी भिवंडीहून आलेल्या ५८ वर्षीय पोलिसास मिरजेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सांगलीत एकाच दिवशी २३ नवे रुग्ण आढळले आहेत. यात हरिपूर रोडवरील काळी वाट परिसरात कर्नाटकातून उपचारासाठी आलेल्या रुग्णामुळे एकाच कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कलानगर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी दोन, तर अरिहंत कॉलनी, चांदणी चौक, अभयनगर, भारती हॉस्पिटल, गणेशनगर, वानलेसवाडी, खणभाग व हरिपूर रोड येथील प्रत्येकी एकाला कोरोना झाला आहे.
मिरज शहरात अकराजणांना कोरोनाचे निदान झाले आहे. यात नदीवेस परिसरातील कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबातील तिघेजण, तसेच कमानवेस व रमा उद्यान येथील खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यालाही लागण झाली आहे. शहरासह तालुक्यातील गुंडेवाडी, अंकली, बिसूर येथे प्रत्येकी एकास, तर कवलापूर येथे आणखी दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे.
जत तालुक्यात शुक्रवारी नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. यामध्ये जत, उमदी, निगडी खुर्द, धावडवाडी येथील प्रत्येकी दोन, तर कोंत्येवबोबलाद व गुलगुंजनाळ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. निगडी खुर्द येथील रुग्ण हैदराबादहून, तर धावडवाडी येथील रुग्ण पुण्याहून आला आहे. कोंत्येवबोबलाद येथील ४५ वर्षीय खासगी डॉक्टर व गुलगुंजनाळ येथील बाधित रुग्णाच्या ३४ वर्षीय नातेवाईकाचा यात समावेश आहे. उमदी येथील बाधितांमध्ये खासगी डॉक्टरसह टेलरिंग व्यावसायिकाचा समावेश आहे.
वाळवा तालुक्यात कामेरी येथील दोन पोलिसांना, साखराळे आणि पेठ हद्दीतील अभियंतानगर आणि आष्टा येथील पाचजणांना कोरोनाचे निदान झाले आहे. साखराळे येथील ६० वर्षीय महिला सुरत येथून १६ जुलैला आली होती. पेठ हद्दीतील अभियंतानगरमध्ये २७ वर्षीय तरुण ३० जूनला पुणे येथून आला होता. कामेरी येथील रेल्वे पोलीस १० जुलैरोजी भुसावळहून आला होता.