corona virus : सांगलीत ११ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस अधीक्षकांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:12 PM2020-07-17T17:12:33+5:302020-07-17T17:15:36+5:30
सांगली शहरात ११ ठिकाणी रोज सकाळी व सायंकाळी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी याबाबतचे आदेश दिले.
सांगली : जिल्ह्यात वाढतच चाललेला कोरोनाचा संसर्ग आणि त्याच्या नियंत्रणासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. यापुढे कोरोनाविषयक लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार सांगली शहरात ११ ठिकाणी रोज सकाळी व सायंकाळी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी याबाबतचे आदेश दिले.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने त्यावर नियंत्रणासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार संसर्ग वाढू नये यासाठी सांगलीत नाकाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या नाकाबंदीमध्ये दुचाकीवरून डबल सीट फिरणे, मास्क न लावता फिरणे यासह इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सायंकाळी सातनंतर अत्यावश्यक सेवेखेरीज जी दुकाने सुरू राहतील त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनीही बाहेर फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.