corona virus : कोरोना कमांडो प्रशिक्षण स्तुत्य उपक्रम : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:25 PM2020-09-28T12:25:36+5:302020-09-28T12:27:46+5:30
राजमती भवन नेमिनाथनगर येथे भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना कमांडो प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते.
सांगली : कोरोना विरूध्दच्या लढ्यासाठी सर्वात मोठी गरज स्वयंसेवकांची भासत आहे. कोरोना कमांडो प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षीत स्वयंसेवकाची गरज पूर्ण करण्याचे काम भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त प्रयत्नातून होत आहे. त्यांचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
राजमती भवन नेमिनाथनगर येथे भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना कमांडो प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, वानलेस हॉस्पिटलचे संचालक डॉ. नथानियल ससे, एनसीसी बटालियनचे कर्नल एस. के. बालू, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्र्रीय कार्यकारणी सदस्य तथा माजी महापौर सुरेश पाटील आदि उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, कोरोना कमांडो प्रशिक्षण घेतलेल्या युवकांची मदत, जे डॉक्टर सेवा देत आहेत त्यांना मदत करण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे, त्यामध्येही कोरोना कमांडोची मदत होणार आहे. ही एक चांगली कल्पना असून याला अनन्य साधारण असे महत्व आहे.
यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. भारतीय जैन संघटनेने देशात अनेक चांगले उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना मुक्तीसाठीही अनेक उपक्रम राबवित आहेत. सर्वांनी प्रयत्न केला तर गावेच्या गावे कोरोना मुक्त करू शकतो. प्रत्येक गावात कोरोना रूग्ण शोधून त्यांना आयसोलेशन किंवा विलगीकरण कक्षात ठेवल्यास कोरोनाच्या फैलावास त्या गावात आळा बसणार आहे. प्रत्येक गाव कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना कमांडो प्रशिक्षण हा एक अत्यंत चांगला उपक्रम आहे. कोरोनाशी यशस्वीपणे लढण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तयार झालेले प्रशिक्षीत युवक कोविड केअर सेंटरमध्ये पॅरॉमेडिकल स्टाफला तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतही मदत करू शकतो. या उपक्रमाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन प्रशासनामार्फत आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी वानलेस हॉस्पिटलचे संचालक डॉ. नथानियल ससे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांनी ऑनलाईन व्हिडीओव्दारे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात माजी महापौर सुरेश पाटील यांनी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन धन्यकुमार शेट्टी व आभार लेफ्टनंट सुभाष पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास कोरोना कमांडो प्रशिक्षणासाठी एनसीसी चे विद्यार्थी व युवक उपस्थित होते.