corona virus : सांगलीत कोविड रॅपिड टेस्टला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:07 PM2020-07-17T17:07:14+5:302020-07-17T17:10:37+5:30
कोरोनाचा वाढता कहर आणि रुग्णसंख्येतही वेगाने वाढ होत असल्याने, लवकर उपचार सुरू करण्यासाठी, कोरोनाचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. यासाठी सांगलीत आता अॅन्टीजेन कीटच्या माध्यमातून जलद तपासणीला सुरूवात झाली असून सांगलीच्या शासकीय रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. पहिल्या टप्प्यात ९७५ कीट उपलब्ध झाले असून कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे कोविड योध्दे आणि रूग्णालयातील इतर रूग्णांच्या तपासणीसाठी या कीटचा वापर केला जाणार आहे.
सांगली : कोरोनाचा वाढता कहर आणि रुग्णसंख्येतही वेगाने वाढ होत असल्याने, लवकर उपचार सुरू करण्यासाठी, कोरोनाचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. यासाठी सांगलीत आता अॅन्टीजेन कीटच्या माध्यमातून जलद तपासणीला सुरूवात झाली असून सांगलीच्या शासकीय रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. पहिल्या टप्प्यात ९७५ कीट उपलब्ध झाले असून कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे कोविड योध्दे आणि रूग्णालयातील इतर रूग्णांच्या तपासणीसाठी या कीटचा वापर केला जाणार आहे.
गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अधिक वाढ होत आहे. या आठवड्यात तर मोठ्या संख्येने रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीला वेळेत निदान होण्याबरोबरच त्वरित उपचार होण्यासाठी रॅपिड टेस्टसाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू होता. राज्यातील मोठ्या शहरांत या जलद चाचण्यांमुळे रूग्णांवर वेळेत उपचार शक्य झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पाठपुरावा करत, परवानगीसाठी प्रयत्न सुरू केले होते.
स्थानिक पातळीवरील निधीतून कीटची उपलब्धता झाली तरी, त्यांच्या वापराबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज होती. त्यानुसार प्रशासनाने पहिल्या टप्प्यात सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात या अॅन्टीजेन कीटचा वापर करण्याचे नियोजन केले होते. कीटची उपलब्धता झाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर २५ तपासण्या करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना कीटच्या वापराचे प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यामुळे आता चाचण्यांची संख्या वाढणार आहे.
प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार मिरजेत कोविड रुग्णांवर उपचार, तर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात नॉन कोविड रूग्णांवर उपचार होणार आहेत. तरीही वाढत्या संसर्गाचा विचार करता, रूग्णांच्या तपासणीसाठी याचा वापर होणार आहे.
पहिल्या टप्प्यात ९७५ अॅन्टीजेन कीटची उपलब्धता झाली आहे. याचा वापर करताना कोरोनाची लक्षणे असलेल्या रूग्णांबरोबरच कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तपासणीसाठी त्याचा वापर होणार आहे. लवकरच चार हजारहून अधिक कीट उपलब्ध केले जाणार आहेत.