corona virus -इस्लामपुरच्या कोरोना मुक्तीला राजकीय श्रेयवादाची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 02:44 PM2020-04-13T14:44:52+5:302020-04-13T14:56:23+5:30
इस्लामपूरच्या कोरोना मुक्तीला आता राजकीय श्रेयवादाची किनार येऊ लागली आहे.इस्लामपूर नव्हे तर उरुण-इस्लामपूर पॅटर्न आणि त्रिसूत्री नव्हे पंचसूत्रीचा अवलंब केला म्हणून शहर कोरोनामुक्त झाले असे सांगत आज नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी पालिका बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता टोले मारले.
इस्लामपूर/सांगली : इस्लामपूरच्या कोरोना मुक्तीला आता राजकीय श्रेयवादाची किनार येऊ लागली आहे.इस्लामपूर नव्हे तर उरुण-इस्लामपूर पॅटर्न आणि त्रिसूत्री नव्हे पंचसूत्रीचा अवलंब केला म्हणून शहर कोरोनामुक्त झाले असे सांगत आज नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी पालिका बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता टोले मारले.
पाटील म्हणाले, या शहराची नगरपालिका १६८ वर्षांची आहे. राजपत्रात या शहराचे नाव उरुण-इस्लामपूर असे आहे. त्यामुळे फक्त इस्लामपूर असे म्हणणारांनी उरुण-इस्लामपूर पॅटर्न म्हणावे, तसेच कोरोना बाधा आणि संसर्ग रोखण्यासाठी त्रिसूत्री नव्हे तर पंचसूत्रीचा अवलंब करण्यात आला हेसुद्धा लक्षात घ्यावे असा चिमटा पाटील यांनी काढला.
आज मी काहीसा चिंतामुक्त झालोय! माझ्या इस्लामपूर मतदारसंघातील जे कुटुंब कोरोनाबाधित झाले होते ते आज पूर्णपणे कोरोनामुक्त झालंय. सांगली जिल्ह्यामध्ये यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची मला खात्री आहे. पण अद्यापही लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 10, 2020
ते म्हणाले, बाधीत व्यक्ती समजल्यावर त्यांची संपर्क साखळी सिद्ध केली. त्यांचे स्क्रिनिंग करून कोणाला घरीच तर कोणाला संस्थात्मक क्वारंटाइन केले. या सर्व व्यक्तींना जीवनावश्यक सुविधा घरपोच दिल्या आणि थेट घरभेटीतून त्यांच्यावर उपचार सुरू केले, अशा पंचसूत्रीतून शहराला कोरोना मुक्त करण्यात यश मिळाले आहे.
शहराची मातृ संस्था म्हणून नगर पालिकेच्या आरोग्य,पाणी पुरवठा, स्वच्छता विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालत काम केले. मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी तर कुटुंबाची काळजी न करता चांगले काम केले आहे. पालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचे जीवन सुसह्य होईल यासाठी नियोजनपूर्वक पाऊले उचलली, अशा सर्व सामूहिक प्रयत्नातून हे यश मिळाले असल्याकडे नगराध्यक्ष पाटील यांनी लक्ष वेधले.
ही वेळ नाही..!
दरम्यान या बैठकीला उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख,नगरसेवक आनंदराव पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही वेळ श्रेयवादाची नाही, अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवायला हवे. तसेच नागरिकांचे जीवन सुसह्य होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत दोन पाटलांमधल्या श्रेयवादावर नाराजी व्यक्त केली.