CoronaVirus :सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 11:26 AM2020-06-06T11:26:04+5:302020-06-06T11:37:12+5:30
झरे (ता. आटपाडी) येथील ५८ वर्षीय कोरोणा बाधित महिलेचा रात्री मृत्यू झाला आहे . ही महिला १ जून पासून आयसोलेशन कक्षात उपचाराखाली होती. त्यांना मधुमेह , थायरॉईड आणि हृदयविकार होता, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील ५८ वर्षीय कोरोणा बाधित महिलेचा रात्री मृत्यू झाला आहे . ही महिला १ जून पासून आयसोलेशन कक्षात उपचाराखाली होती. त्यांना मधुमेह , थायरॉईड आणि हृदयविकार होता, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात ७८ रूग्ण कोरोनामुक्त, उपचाराखाली ५७ रूग्ण
कोरोनामुळे सांगली जिल्ह्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १४३ झाली असून ८१ जण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या ५७ आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण १४३ रुग्ण कोरोनाबाधित ठरले आहेत. उपचाराखाली असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी पाच रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
काल दुपारी १ वाजेपर्यंत ११ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यातील करगणी येथील ३८ वर्षाचा पुरूष, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील ७५ वर्षाची महिला (पॉझीटीव्ह रूग्णाची पत्नी), कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील ५० वर्षाची स्त्री, शिराळा तालुक्यातील काळुखेवाडी येथील ४० वर्षाची स्त्री (मणदूर येथील पॉझीटीव्ह रूग्णाची मुलगी), कवठेमहांकाळ तालुक्यातील खरसिंग येथील मुंबईवरून आलेला २१ वर्षाचा पुरूष, तासगाव तालुक्यातील वायफळे येथील ठाणे वरून आलेला १९ वर्षाचा पुरूष, खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील मुंबईवरून आलेला ३५ वर्षाचा पुरूष, मिरज तालुक्यातील मालगांव येथील पनवेल वरून आलेली ५० वर्षाची महिला, खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील ५५ वर्षाची महिला (पॉझीटीव्ह रूग्णाची पत्नी), जत येथील ३५ वर्षाचा पुरूष (खलाटी पॉझीटीव्ह रूग्णाचा सहवासीत). आजअखेर ग्रामीण भागातील पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या ९९ असून शहरी भागातील २९ तर महानगरपालिका क्षेत्रातील पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या ११ इतकी आहे.
पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील पॉझीटीव्ह आलेला ६० वर्षाचा रूग्ण नॉनइन्व्हेजीव व्हेंन्टिलेटरवर ठेवण्यात आला आहे. औंढी तालुका जत येथील ५५ वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून सदर रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. कडेबिसरी (सांगोला, सोलापूर) येथील ४८ वर्षाच्या पुरूष रूग्णाला ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थिर आहे. खिरवडे (शिराळा) येथील ५६ वर्षाच्या पुरूष रूग्णावर सद्यस्थितीत नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थिर आहे. मणदुर (शिराळा) येथील ८१ वर्षाच्या पुरूष रूग्णास नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला असून रूग्णाची स्थिती स्थिर आहे.