corona virus : सांगलीत नॉन कोविड रुग्णांचे उपचाराअभावी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 01:55 PM2020-09-04T13:55:11+5:302020-09-04T13:58:14+5:30

सांगली जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गेल्या दोन महिन्यांपासून नॉन कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या भीतीने काही खासगी रुग्णालये बंद आहेत, तर काहींनी केवळ ओपीडीच सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसह सांगली-मिरज शासकीय रुग्णालयावर नॉन कोविड रुग्णांचा ताण वाढला आहे.

Corona virus: Lack of treatment for non-covid patients in Sangli | corona virus : सांगलीत नॉन कोविड रुग्णांचे उपचाराअभावी हाल

corona virus : सांगलीत नॉन कोविड रुग्णांचे उपचाराअभावी हाल

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीत नॉन कोविड रुग्णांचे उपचाराअभावी हाल, खासगी रुग्णालयात नकार कोरोना चाचणीची सक्ती; सिव्हिल, मनपा रुग्णालयांवर ताण वाढला

शीतल पाटील 

सांगली : जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गेल्या दोन महिन्यांपासून नॉन कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या भीतीने काही खासगी रुग्णालये बंद आहेत, तर काहींनी केवळ ओपीडीच सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसह सांगली-मिरज शासकीय रुग्णालयावर नॉन कोविड रुग्णांचा ताण वाढला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होताच अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार थांबविले. केवळ दूरध्वनीवरून रुग्णांना सल्ला दिला जात होता. संसर्ग आणखी वाढताच काही रुग्णालयांनी ओपीडीही बंद केली. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांवरील उपचाराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. ताप, सर्दी, खोकला असेल, तर बहुतांश रुग्णालयांनी उपचारास नकार दिल्याचा अनुभवही अनेक रुग्णांना आला आहे.

१० ते १५ वर्षे एकाच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवरही उपचारासाठी भटकंतीची वेळ आली आहे. चार तास थांबून, हजारो रुपये खर्चून उपचार घेणाऱ्या या रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार मिळालेले नाहीत. त्यातूनही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत रुग्णालयांनीच उपचारासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू केला, तर आंतररुग्ण विभागात दाखल होण्यासाठी कोविड चाचणीची सक्ती केली जात आहे. त्यासाठी या रुग्णांना पुन्हा महापालिकेची आरोग्य केंद्रे, खासगी लॅबमध्ये चाचणी करून घ्यावी लागते. यात बराच वेळ निघून जातो. त्यामुळे रुग्ण चिंताजनक स्थितीत पोहोचतो.

अशा नॉन कोविड रुग्णांना सांगली-मिरज सिव्हिल, महापालिकेच्या आरोग्य केंद्रांनी मात्र मोठा आधार दिला आहे. सांगली-मिरज सिव्हिलमधील ओपीडीत दररोज २ ते ३ हजार रुग्ण येतात. जिल्हाबंदीमुळे ओपीडीतील रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, आंतररुग्ण विभागातील रुग्णांची संख्या वाढली आहे.

सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात खाटांच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाले आहेत. एकट्या स्त्रीरोग विभागात पाचशे ते साडेपाचशे रुग्ण आहेत. याशिवाय हृदयविकार, पोटाच्या विकाराचे रुग्णही मोठ्या संख्येने आहेत. महापालिकेच्या पंचमुखी मारुती रस्त्यावरील डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दररोजची ओपीडी १०० ते १२५ ची होती. आता कोरोनाच्या काळात त्यात २५० पर्यंत वाढ झाली आहे. यात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले अनेक रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयावरील ताण वाढला आहे.


नॉन कोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयांनी उपचारास नकार दिल्याने शासकीय रुग्णालयावरील ताण वाढला आहे. वास्तविक खासगी रुग्णालयांनी कोविड अथवा नॉन कोविड रुग्णांवर आवश्यक ती खबरदारी घेऊन उपचार करण्याची गरज आहे. पण ही रुग्णालये उपचारासाठी टाळाटाळ करीत आहेत. शासकीय रुग्णालयांना क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली. खासगी रुग्णालयांनी थोडेफार सहकार्य केले तरी नॉन कोविड रुग्णांचे हाल होणार नाहीत.
- डॉ. नंदकुमार गायकवाड,
वैद्यकीय अधीक्षक, सिव्हिल रुग्णालय.

Web Title: Corona virus: Lack of treatment for non-covid patients in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.