CoronaVirus Lockdown : कोरोनामुळे यंदा सांगलीच्या गणरायांचे परदेशगमन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:14 PM2020-05-23T17:14:31+5:302020-05-23T17:15:07+5:30
गणेशोत्सव तीन महिन्यांवर येऊनही मूर्तीशाळांत शांतताच आहे. कोरोनाच्या संकटात उत्सव जल्लोषी होण्याविषयी मूर्तिकार साशंक आहेत. लॉकडाऊनमध्ये कच्च्या मालाअभावी मूर्ती कामाने वेग घेतलेला नाही. यंदा सांगलीतून अमेरिकेला मूर्तींची निर्यातही होणार नाही.
संतोष भिसे
सांगली : गणेशोत्सव तीन महिन्यांवर येऊनही मूर्तीशाळांत शांतताच आहे. कोरोनाच्या संकटात उत्सव जल्लोषी होण्याविषयी मूर्तिकार साशंक आहेत. लॉकडाऊनमध्ये कच्च्या मालाअभावी मूर्ती कामाने वेग घेतलेला नाही. यंदा सांगलीतून अमेरिकेला मूर्तींची निर्यातही होणार नाही.
यंदा २२ अॉगस्टपासून सुुरू होणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. यदाकदाचित साथ संपली तरी, संसर्गाची काळजी घेऊनच परवानगी दिली जाईल. भीतीने लोकही रस्त्यावर येणार नाहीत. वर्गणीसाठी मंडळांची कसरत होईल. या सर्वांचा परिणाम म्हणून उत्सव साधेपणाने होईल. याचा फटका मूर्तिकारांना बसला आहे.
मे संपत आला तरी मूर्ती तयार नाहीत. प्लास्टर, शाडू, रंग, चमकी आदी कच्चा माल मुंबई, पुणे, पेण, पनवेल येथून येतो. कारागीर परराज्यातून तसेच कोल्हापूर, रत्नागिरी, कऱ्हाड येथून येतात. लॉकडाऊनमुळे साऱ्याचा खोळंबा झाला.
आता वाहतूक सुरू झाल्याने कामाला गती येण्याची अपेक्षा आहे. मोठी मंडळे मे-जूनमध्येच मोठ्या व उंच मूर्तींचे बुकिंग करतात. यंदा मंडळे अजूनही फिरकली नसल्याची माहिती मूर्तिकार माधव गाडगीळ यांनी दिली. छोट्या व कमी उंचीच्या मूर्तींकडे मूर्तिकारांचा कल आहे.
सांगलीतून दरवर्षी अमेरिकेत कॅनडाला मूर्ती पाठविल्या जातात. तेथील मराठी मंडळे व काही व्यावसायिक मागवून घेतात.
यंदा अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजविला असल्याने तेथील व्यावसायिक संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे त्यांनी अॉर्डर नोंदविलेल्या नाहीत. तेथील महामारी लवकर संपण्याची चिन्हे नसल्यानेही मूर्तींना मागणी नाही.