corona virus : जनता कर्फ्यूला आता पोलिसांचे बळ : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 01:49 PM2020-09-14T13:49:10+5:302020-09-14T13:51:18+5:30

सांगली शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भाजी बाजारासह विविध ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना  कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

corona virus: public curfew now police force; Jayant Patil | corona virus : जनता कर्फ्यूला आता पोलिसांचे बळ : जयंत पाटील

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा यांनी भूमिका मांडली. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे जनता कर्फ्यूला आता पोलिसांचे बळ : जयंत पाटील गर्दी टाळण्यासाठी कडक कारवाई, रस्त्यावरील बाजाराला प्रतिबंध

सांगली : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. बेड, आॅक्सिजन, व्हेटिलेंटरची कमतरता असल्याने प्रशासनालाही मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणांचा शोध घेतला जाणार आहे. भाजी बाजारासह विविध ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना  कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी, उद्योजकांची बैठक झाली. यावेळी जनता कर्फ्यू, वाढता संसर्ग, बेडची व्यवस्था यावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पाटील म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात भाजी विक्रीच्या ठिकाणी होणारी गर्दी हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी अशा गर्दीच्या ठिकाणांचा शोध घेऊन तिथे पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यावरील बाजार बंद केले जातील, असेही सांगितले.

व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, जनता कर्फ्यू निष्फळ ठरला आहे. त्यामुळे असोसिएशनने केलेल्या मागणीनुसार संचारबंदी, जिल्हाबंदीसह संपूर्ण लॉकडाऊन केले, तर कोरोनाची स्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल. दरम्यान, व्यापारी महासंघाने लॉकडाऊनला विरोध केला. जिल्ह्यात शंभर टक्के बंद राहणार असेल तर आम्ही दुकाने बंद ठेवू, अशी भूमिका घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, शिवसेनेचे बजरंग पाटील, शंभोराज काटकर, अतुल शहा, विराज कोकणे, राजेंद्र पवार, आप्पा कोरे, राकेश मिरजे, शरद शहा, सचिन पाटील, शिवाजी पाटील, संजय आराणके, प्रसाद मदभावीकर, शैलेश पवार, अजित सूर्यवंशी, युसूफ जमादार, रत्नाकर नांगरे उपस्थित होते.

...तर संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय

जनता कर्फ्यू माझ्यासाठी नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आता गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यात अपयश आल्यास संपूर्ण जिल्हा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल. लॉकडाऊनबाबत लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योजकांशी चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

 

Web Title: corona virus: public curfew now police force; Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.