corona virus : खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्या : सौरभ राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 05:26 PM2020-09-02T17:26:43+5:302020-09-02T17:30:28+5:30

सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने येथील खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्यावी. जे हॉस्पिटल्स या कामी नकार देतील अशी हॉस्पिटल्स प्रशासनाने ताब्यात घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

corona virus: Seek help from private doctors and hospitals: Saurabh Rao | corona virus : खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्या : सौरभ राव

corona virus : खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्या : सौरभ राव

Next
ठळक मुद्दे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्या :सौरभ रावकोविड हॉस्पीटलची आयुक्तांनी केली पहाणी

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने येथील खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्यावी. जे हॉस्पिटल्स या कामी नकार देतील अशी हॉस्पिटल्स प्रशासनाने ताब्यात घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, कोरोनाच्या उपाय योजना संदर्भात निधीची कमतरता पडणार नाही. आवश्यक तो निधी प्रशासनाकडे लवकरच सुपुर्द करण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुल येथे 110 तर शासकीय महाविद्यालय मिरज येथे 50 बेड्सचे डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल उभारणीचे काम सुरू असून लवकरच ते कार्यान्वित होईल. ते कार्यान्वित झाल्यानंतर येथील रूग्णांची मोठी सोय होईल.

जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आढावा घेण्यासाठी विविध हॉस्पीटल्स मॅनेजमेंटशी झुम ॲपव्दारे संवाद साधावा. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी हॉस्पिटल चालविण्याचा अनुभव असणाऱ्या खाजगी तसेच निवृत्त डॉक्टरांची सेवा घ्यावी. त्याचबरोबर रूग्णालयातील उपलब्ध असणाऱ्या बेड मॅनेजमेंटचाही आढावा दररोज घेण्यात यावा, अशी सूचना करून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील कोरोनाविषयक स्थितीची व करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली, ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील 50 वर्षापुढील कोमॉर्बिडिटी असलेल्या व्यक्तींची ॲन्टीजन टेस्ट करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील बाधित रूग्णांपैकी 60 टक्के रूग्ण बरे झाले आहेत तर 36 टक्के रूग्ण सध्या उपचाराधिन असल्याचे सांगून जिल्हा प्रशासनाकडे लवकरच 30 व्हेंटीलेटर उपलब्ध होणार असल्याचीही माहिती श्री. चौधरी यांनी याप्रसंगी दिली. या बैठकीनंतर आयुक्तांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे उभारण्यात येणाऱ्या 110 बेडच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलची पहाणी केली.

या आढावा बैठकीसाठी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी विजया यादव तसेच सर्वश्री विवेक आगवणे, बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र गाडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा कोषागार अधिकारी सुशिलकुमार केंबळे आदि उपस्थित होते.

Web Title: corona virus: Seek help from private doctors and hospitals: Saurabh Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.